शिस्त व नियमांचे पालन केल्यासच सुजाण नागरिक घडतो - पोलीस महानिरीक्षक येनपुरे

संगमनेर Live
0
शिस्त व नियमांचे पालन केल्यासच सुजाण नागरिक घडतो - पोलीस महानिरीक्षक येनपुरे

◻️ ​करजगाव येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती साजरी


संगमनेर LIVE (​नेवासा) | “विद्यार्थी जीवनातच नियमावली आणि शिस्तीचा अंगीकार केला, तरच भविष्यात एक चांगला माणूस आणि सुजाण नागरिक घडतो. मानवी जीवन एकदाच मिळते, त्यामुळे विद्यार्थ्यांनी रोजचा दिनक्रम निश्चित करून भविष्यातील ध्येयाचा वेध घेतला पाहिजे," असे प्रतिपादन नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय येनपुरे यांनी केले.

​करजगाव (ता. नेवासा) येथे पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३९ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते अध्यक्षीय भाषणात बोलत होते. यावेळी त्यांनी आंतरराष्ट्रीय घडामोडींचा संदर्भ देत जागतिक शांततेचे महत्त्व विशद केले, तसेच तिसऱ्या महायुध्दाच्या धोक्याबाबत चिंता व्यक्त केली.

​विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना येनपुरे यांनी क्रिकेट विश्‍वातील विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकर यांचे उदाहरण दिले. ते म्हणाले, “दोघांमध्येही विलक्षण गुणवत्ता होती; मात्र सचिन तेंडुलकरने आयुष्यभर शिस्त, कठोर सराव आणि ध्येयवाद जपल्यामुळेच तो भारतरत्न या सर्वोच्च सन्मानापर्यंत मजल मारू शकला. विद्यार्थ्यांनीही यशासाठी असाच ध्येयवादी दृष्टिकोन बाळगणे आवश्यक आहे.”

​सध्याच्या आधुनिक युगावर भाष्य करताना त्यांनी सांगितले, “मोबाईलच्या जमान्यात आता ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (एआय) तंत्रज्ञान आले आहे. तंत्रज्ञान उपयुक्त असले, तरी मोबाईलचा वापर अत्यंत काळजीपूर्वक केला पाहिजे. जर मोबाईलमुळे अभ्यासात अडथळा किंवा व्यत्यय येत असेल, तर त्यापासून वेळीच दूर राहणे हिताचे ठरेल.” असे नमूद केले.

“महापुरुषांनी आपल्या जीवनाचा मार्ग लोककल्याण आणि मूल्यांच्या आधारे क्रमण केला, म्हणूनच ते काळाच्या पलीकडे जाऊन अमर झाले. केवळ जयंती साजरी न करता महापुरुषांचे विचार आचरणात आणल्यास व्यक्तिमत्त्व समृध्द होते आणि उच्च पदांपर्यंत पोहोचण्याची प्रेरणा मिळते," असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. यानंतर झालेल्या प्रश्नोत्तरांच्या सत्रात विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध शंकांचे येनपुरे यांनी मार्मिक उत्तरे देऊन समाधान केले.

यावेळी ​कार्यक्रमात रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य ॲड. संदीप वर्पे, प्रा. रवींद्र जायभाय, प्रा. जगदीश सोनवणे आणि किरण कडू यांनीही मनोगत व्यक्त केले.

​याप्रसंगी शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू, पोलीस निरीक्षक विलास पुजारी, सोनई पोलीस ठाण्याचे सपोनि अनिल मोरे, स्कूल कमिटीचे अध्यक्ष सुभाष टेमक, सूर्यभान फुलसौंदर, मुळा कारखान्याचे संचालक चंद्रकांत टेमक, नामदेव कंक, संजय कंक, सुहास टेमक, कर्णासाहेब औटी, पानेगावचे माजी सरपंच हौशाबापू जंगले, माजी उपसरपंच डॉ. जयवंतराव गुडधे, कैलास बाचकर, राजेंद्र टेमक, भाऊसाहेब राजगुरू, नानासाहेब पुंड, आशुतोष माकोणे, ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब नवगिरे, केंद्रीय पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कमलेश गायकवाड, दिगंबर माकोणे, छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयाचे प्राचार्य एस. बी. बनकर, पर्यवेक्षक वाय. एस. पठाण यांच्यासह शिक्षक ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, या ​कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. विठ्ठलराव देवखिळे यांनी केले, तर सूत्रसंचालन दुर्गा बिडवे यांनी मानले. अशी माहिती पत्रकार बाळासाहेब नवगिरे यांनी कळवली आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !