उंबरी बाळापूर येथे मतमाऊली यात्रोत्सवास प्रारंभ
◻️ चार दिवसीय उत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या मतमाऊली यात्रा उत्सवास बुधवारपासून भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला आहे. यंदा यात्रेचे हे अमृत महोत्सवानंतरचे ७७ वे वर्ष असून, यानिमित्त ख्रिस्त राजा चर्च प्रांगणात बुधवार ते शनिवार दरम्यान चार दिवसीय धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रा कमिटीच्या वतीने या संपूर्ण सोहळ्याची चोख तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
यात्रोत्सवानिमित्त बुधवार ते शुक्रवार दरम्यान दररोज सायंकाळी विशेष मिस्सा आणि प्रवचन होणार आहे. यामध्ये बुधवार, दि. २३ सप्टेंबर रोजी रे. फा. प्रमोद बोधक, गुरुवार, दि. २४ सप्टेंबर रोजी रे. फा. प्रशांत शाहराव, तर शुक्रवार, दि. २५ सप्टेंबर रोजी फादर ॲड्र्यू जाधव हे मिस्सा व प्रवचन देणार आहेत. या धार्मिक विधीनंतर दररोज भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे.
यात्रेच्या मुख्य दिवशी, शनिवार दि. २६ सप्टेंबर रोजी फादर पीटर डिसूझा यांचे विशेष प्रवचन व मिस्सा विधी संपन्न होणार असून, त्यानंतर उपस्थित सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या मुख्य सोहळ्यास फादर ज्यो. गायकवाड, फादर ख्रिस्तफोर शेळके, फादर विनोद शेळके, फादर राजू शेळके, फादर अजय शेळके, फादर फ्रान्सिस पटेकर, फादर रॉबर्ट दास, फादर आबा वाघमारे, फादर नेल्सन परेरा, फादर नेव्हेल फर्नांडिस, डी. रोशन, सिस्टर अर्चना बागुल, सिस्टर ज्योती शेळके यांच्यासह संगमनेर येथील ‘जिजस ॲड मेरी’, घुलेवाडी येथील ‘आशातारा’ व पानोडी येथील ‘होली क्रॉस’ कॉन्व्हेंटच्या सिस्टर्स आणि विविध मान्यवर धर्मगुरू उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, यात्रेनिमित्त आयोजित सर्व धार्मिक विधी व महाप्रसादाचा लाभ पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन फादर ज्यो. गायकवाड यांच्यासह यात्रा कमिटी, ख्रिस्त राजा तरुण मित्र मंडळ, संत जोसेफ युथ ग्रुप आणि उंबरी बाळापूर ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.