गणेशोत्सव हे समाजप्रबोधन प्रभावी माध्यम बनावे - आमदार अमोल खताळ

संगमनेर Live
0
गणेशोत्सव हे समाजप्रबोधन प्रभावी माध्यम बनावे - आमदार अमोल खताळ

◻️ व्यसनमुक्त आणि पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याचे आवाहन 


संगमनेर LIVE | समाजात दिवसेंदिवस वाढणारी व्यसनाधीनता आणि नशेचे प्रमाण अत्यंत चिंताजनक असून, नशामुक्त समाज घडवण्यासाठी गणेशोत्सवासारख्या लोकउत्सवांतून व्यापक प्रबोधन होणे काळाची गरज आहे. मंडळांनी डीजेला फाटा देऊन पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केले. तसेच, नियमांचे पालन करणाऱ्या गणेश मंडळांना प्रशासनाने विनाकारण त्रास न देता सहकार्याची भूमिका ठेवावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

​शहरातील शिवसेना महायुती जनसंपर्क कार्यालय व निवासस्थानी आमदार अमोल खताळ आणि त्यांच्या पत्नी नीलम खताळ यांच्या हस्ते विधिवत पूजन करून लाडक्या बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली. याप्रसंगी माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.

​गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर बोलताना आमदार खताळ म्हणाले की, “उत्सवाचा आनंद द्विगुणित करताना सर्वसामान्य नागरिकांना, वृध्द व रुग्णांना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. कायदा, सुव्यवस्था आणि सामाजिक शांतता अबाधित राखण्याची जबाबदारी केवळ पोलिसांची नसून गणेश मंडळांचे कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून व्यसनमुक्ती आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबवून समाज परिवर्तनाला दिशा दिली पाहिजे.”

​डीजेवरील बंदीबाबतच्या शासकीय अध्यादेशाचा संदर्भ देत त्यांनी नमूद केले की, “अनेक गणेश मंडळांनी स्वयंस्फूर्तीने डीजेला पर्याय म्हणून पारंपरिक वाद्ये आणि बॅड पथके तयार केली आहेत. नियमांची चौकट पाळणाऱ्या अशा मंडळांचे कौतुक व्हायला हवे. उत्सव शांततेत पार पडावा यासाठी प्रयत्न करणाऱ्या मंडळांना प्रशासनाने विनाकारण अडचणीत न आणता सहकार्य करावे.”

​“यंदाचा गणेशोत्सव सर्वांच्या आयुष्यात सुख, समृध्दी आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो. संगमनेर तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस होऊन बळीराजाच्या शेतात भरघोस पीक यावे आणि त्याच्या कष्टाचे चीज व्हावे, हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना आहे. समाजाने सर्व हेवेदावे बाजूला ठेवून एकोप्याने आणि गुण्यागोविंदाने एकत्र येत सामाजिक सलोखा अधिक दृढ करावा.” असे आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !