संस्थेने उत्पादनवाढ व सभासद हिताला प्राधान्य द्यावे - सौ. शालिनीताई विखे
◻️ प्रवरा फळे-भाजीपाला संस्थेची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
संगमनेर LIVE (लोणी) | “शेतकऱ्यांना विविध सेवा-सुविधा उपलब्ध करून देत, शेती उत्पादनाला आधार देण्याच्या उद्देशाने सहकारी संस्थांची स्थापना झाली. आज या संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा आधार मिळत आहे. जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दूरदृष्टीतून उभी राहिलेली प्रवरा फळे-भाजीपाला उत्पादक, प्रक्रिया, खरेदी-विक्री सहकारी संस्था शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरत असून, संस्थेने विविध व्यवसायांच्या माध्यमातून उत्पादनवाढीसह सभासद हिताला प्राधान्य द्यावे,” असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी केले.
प्रवरा फळे-भाजीपाला उत्पादक, प्रक्रिया, खरेदी-विक्री शेतकरी सहकारी संस्थेची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन मकरंद गुणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. याप्रसंगी व्हाईस चेअरमन विजय लगड, ॲड. आप्पासाहेब दिघे, दत्ता शिरसाठ, सहसचिव भारत घोगरे, अण्णासाहेब जोशी, रामनाथ आहेर, माधवराव कडसकर, सौ. वैशाली गिरमे, संस्थेचे व्यवस्थापक प्रदीप सोनवणे यांच्यासह संस्थेचे सर्व संचालक, सभासद व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना सौ. विखे म्हणाल्या की, प्रवरा फळे-भाजीपाला संस्थेच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना विविध सेवा-सुविधा मिळत आहेत. संस्थेने सुरू केलेला खत पुरवठा उपक्रम ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे. साखर कारखान्याच्या माध्यमातून निर्माण झालेल्या विविध सहकारी संस्थांमुळे परिसरातील सर्वसामान्य नागरिक व सभासदांना मोठ्या प्रमाणावर सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.
संस्थेने भविष्यात विविध व्यवसायांचा विस्तार करून उत्पादनवाढीसाठी प्रयत्न करावेत. स्वतंत्र रोपवाटिका सुरू करण्याबरोबरच बाभळेश्वर येथील कृषी विज्ञान केंद्राच्या सहकाऱ्याने ऊस उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करावे. शेतकरी हिताचे निर्णय घेताना विविध संस्थांचे सहकार्य घेऊन संस्थेच्या प्रगतीची वाटचाल अविरत सुरू ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले.
ॲड. आप्पासाहेब दिघे यांनी संस्थेमार्फत शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सेवा-सुविधांमुळे शेती उत्पादनाला मोठा आधार मिळत असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांना वेळेवर खते उपलब्ध करून देण्यात संस्थेची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले. दत्ता शिरसाठ यांनी संस्थेने रोपवाटिका सुरू करण्याबरोबरच शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
संस्थेचे चेअरमन मकरंद गुणे यांनी संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेत भविष्यातील वाटचालीची माहिती दिली. मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनातून संस्था विविध सेवा-सुविधा उपलब्ध करून देत आहे. संस्था सभासदांचे हित जपण्याचे काम सदैव करीत असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेचे उपाध्यक्ष विजय लगड यांनी अहवाल वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन व्यवस्थापक प्रदीप सोनवणे यांनी केले.