आश्वी येथील दिग्विजय गणेश मित्र मंडळाकडून गणेशोत्सवाचे भव्य आयोजन
◻️ म्हसे वस्तीवर भारुड, संगीत प्रवचन व ‘होम मिनिस्टर’ची भाविकांना पर्वणी
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | गणेशोत्सवाच्या पवित्र पर्वावर आश्वी बुद्रुक (ता. संगमनेर) येथील ‘दिग्विजय गणेश मित्र मंडळ’ यंदा उत्सवाचे ६७ वे वर्ष उत्साहात साजरे करत आहे. या निमित्ताने गणेशोत्सव काळात विविध धार्मिक, अध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले असून म्हसे वस्तीवरील श्री निळकंठेश्वर मंदिराच्या प्रांगणात भाविकांना या भरगच्च कार्यक्रमांची पर्वणी अनुभवता येणार आहे.
सोमवारी (दि. १४) श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी पारंपरिक वाद्यांच्या गजरात वाजतगाजत गणरायाचे आगमन होऊन विधिवत श्रींची प्रतिष्ठापना करण्यात येईल. गणेशोत्सवादरम्यान गुरुवारी (दि. १७) सायंकाळी ७ वाजता ह.भ.प. हमीद महाराज सय्यद आणि सहकाऱ्यांचा प्रसिध्द ‘भारुडाचे रंगी’ हा विनोदी सोंगी भारुडाचा कार्यक्रम रंगणार आहे.
त्यानंतर शनिवारी (दि. १९) रात्री ९ वाजता भाविकांच्या उपस्थितीत सामुदायिक हनुमान चालीसा पठण पार पडेल. रविवारी (दि. २०) सायंकाळी ७ वाजता ह.भ.प. अनंत महाराज काळे (मेंढवन) यांचे सुश्राव्य हरिकीर्तन होणार असून, सोमवारी (दि. २१) सायंकाळी ७ वाजता महिला भगिनींसाठी विशेष ‘होम मिनिस्टर - खेळ पैठणीचा’ हा सांस्कृतिक मनोरंजक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच बुधवारी (दि. २३) सायंकाळी ७ वाजता ह.भ.प. सौ. शालिनीताई इंदुरीकर (देशमुख) यांचे संगीत प्रवचन संपन्न होईल.
उत्सवाची सांगता शुक्रवारी (दि. २५) अनंत चतुर्दशीच्या दिवशी होणार असून, पारंपरिक वाद्यांच्या गजरात ‘दिग्विजयच्या राजा'ची भव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात येईल व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, या सर्व धार्मिक, अध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा आश्वी बुद्रुक व परिसरातील सर्व भाविक, ग्रामस्थ आणि महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन दिग्विजय गणेश मित्र मंडळ व श्री निळकंठेश्वर प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आले आहे.