भंडारदरा धरणातून सोमवारपासून आवर्तन - आमदार अमोल खताळ
◻️ संगमनेर तालुक्यातील खरीप पिकांना मिळणार दिलासा
संगमनेर LIVE | गणेश उत्सव आणि ग्रामीण भागात शेती पिकांसाठी पाण्याची गरज लक्षात घेवून, भंडारदरा धरणातून आवर्तन सोडण्याच्या केलेल्या मागणीची दखल घेत जलसंपदा विभागाने सोमवार पासून आवर्तन सोडण्याचा महत्वपूर्ण निर्णय जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतला असल्याची माहिती आमदार अमोल खताळ पाटील यांनी दिली.
संगमनेर तालुक्यात यंदा अपेक्षेइतका पाऊस न झाल्याने शेती पीकं धोक्यात आली आहेत. काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचीही टंचाई भासू लागल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी आमदार अमोल खताळ यांची भेट घेवून पाण्याची उपलब्धता करुन देण्याची मागणी केली होती. गणेश विसर्जानासाठी पाण्याची उपलब्धता व्हावी आशी अपेक्षा गणेश भक्तांसह मंडळाच्या कार्यकर्त्यांची होती. यासंदर्भात आमदार खताळ यांनी लोणी येथे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आगामी गणेश उत्सव आणि ग्रामीण भागात झालेली पाण्याची टंचाई लक्षात घेवून आवर्तन सोडण्याची विनंती केली होती.
या संदर्भात मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीतही आमदार खताळ यांनी आवर्तन सोडण्याच्या केलेल्या आग्रहाची दखल घेवून, जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी सोमवार, दिनांक १४ सप्टेंबर २०२६ पासून खरीप पिकांसाठी आवर्तन सोडण्याचे निर्देश दिले आहेत. जलसंपदा विभागाने घेतलेल्या निर्णयाबद्दल आ.अमोल खताळ यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आभार मानले आहेत.