प्रतापपूर येथे कै. विठ्ठलराव आंधळे यांच्या पुण्यस्मरणार्थ साकारले सांस्कृतिक भवन
◻️ उद्या शुक्रवारी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते लोकार्पण; महंत उध्दव महाराज मंडलिक यांचे कीर्तन
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | संगमनेर तालुक्यातील प्रतापपूर येथील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व आणि प्रगतशील शेतकरी कै. विठ्ठल सावळेराव आंधळे यांचे उद्या शुक्रवार, दि. २ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रथम पुण्यस्मरण आहे. वडिलांवरील निस्सीम प्रेम, आदर आणि समाजाप्रती असलेली कृतज्ञतेची भावना जपत त्यांचे सुपुत्र दिनकरराव विठ्ठल आंधळे यांनी प्रतापपूर ग्रामस्थांच्या सोयीसाठी स्वखर्चातून सुमारे ४ लाख रुपये खर्चून भव्य सांस्कृतिक भवन उभारले आहे. या नवनिर्मित सांस्कृतिक भवनाचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते संपन्न होणार असल्याची माहिती आंधळे कुटुंबीयांनी दिली आहे.
कै. विठ्ठल सावळेराव आंधळे (निधन: १४ सप्टेंबर २०२५) यांनी आयुष्यभर शेतीमध्ये प्रयोगशीलता जपत मोठा लोकसंग्रह जोडला होता. गरजू व्यक्तीला तत्परतेने मदत करणे, प्रेमळ तरीही शिस्तप्रिय स्वभाव आणि गावासह पंचक्रोशीतील सामाजिक कार्यात पुढाकार घेणे ही त्यांची प्रमुख ओळख होती. त्यांनी आपल्या कुटुंबातील सर्व पिढ्यांवर उच्च शिक्षण, उत्तम संस्कार आणि लोकसेवेची शिकवण रुजवली. त्यांच्या याच विचारधारेचा वारसा पुढे नेत आंधळे परिवाराने पुण्यस्मरणाचे औचित्य साधून ग्रामविकासाला हातभार लावणारे सांस्कृतिक भवन उभे करून एक नवा आदर्श घालून दिला आहे.
हा प्रथम पुण्यस्मरण सोहळा उद्या शुक्रवार, दि. २ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता आश्वी-प्रतापपूर रोडवरील इरिगेशन बंगल्यालगत असलेल्या ‘साई लॉन्स’ येथे आयोजित करण्यात आला आहे. सकाळी १० वाजता महंत ह.भ.प. उध्दव महाराज मंडलिक (नेवासेकर) यांचे अमृततुल्य कीर्तन पार पडणार आहे. तसेच माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते सांस्कृतिक भवनाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. याप्रसंगी जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, उद्योग आणि कृषी क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहून कै. आंधळे यांना श्रध्दांजली अर्पण करणार आहे. यानंतर उपस्थितांसाठी महाप्रसादाचे आयोजन देखील आंधळे कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले आहे.
दरम्यान, या पुण्यस्मरण सोहळ्यास पंचक्रोशीतील ग्रामस्थ, आप्तेष्ट, नातेवाईक व मित्रपरिवाराने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सौ. बिजला निवृत्ती घुगे (मुलगी), राधाकृष्ण विठ्ठल आंधळे (मुलगा), सौ. विजया राधाकृष्ण आंधळे (सून), दिनकरराव विठ्ठल आंधळे (मुलगा), सौ. कमल दिनकरराव आंधळे (सून), ज्ञानेश्वर विठ्ठल आंधळे (मुलगा), सौ. चंद्रकला ज्ञानेश्वर आंधळे (सून), संजय विठ्ठल आंधळे (मुलगा), सौ. रोहिणी संजय आंधळे (सून), सौ. जुही सचिन चकणे (नात), सौ. अर्चना कैलास सांगळे (नात) दिलीप दिनकर आंधळे (नातू) सौ. प्रतिमा दिलीप आंधळे (नातसून) निलेश दिनकर आंधळे (नातू) सौ. स्वाती निलेश आंधळे (नातसून), ऋषिकेश राधाकृष्ण आंधळे (नातू), सौ. अंकिता ऋषिकेश आंधळे (नातसून), शुभम ज्ञानेश्वर आंधळे (नातू) सौ. शिवानी शुभम आंधळे (नातसून), दर्शन संजय आंधळे (नातू), सौ. ज्ञानेश्वरी दर्शन आंधळे (नातसून), निसर्ग संजय आंधळे (नातू), सौ. सुप्रिया निसर्ग आंधळे (नातसून), चिरंजीव प्रद्युम्न राधाकृष्ण आंधळे (नातू) तसेच समस्त आंधळे परिवार, प्रतापपूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.