बाळासाहेब थोरात-राधाकृष्ण विखे एकत्र येणे शेतकरी हिताचे - आमदार रोहित पवार
◻️ जिल्हा सहकारी बॅकेत राजकारण नको; सरकारने दुष्काळग्रस्तांना तातडीने मदत द्यावी
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | “सहकार क्षेत्रातील संस्था या कोणत्याही एका पक्षाच्या नसून त्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हितासाठी असतात. जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासारखे परस्परविरोधी नेते एकत्र येऊन जर जिल्हा बॅकेत बिनविरोध निर्णय घेत असतील, तर ते संस्थेच्या आणि शेतकऱ्यांच्या हिताचेच आहे,” अशी भूमिका राष्ट्रवादी काॅग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मांडली. तसेच दुष्काळी पंचनामे आणि मदतीवरून त्यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला. संगमनेर येथे जिल्हा सहकारी बॅकेच्या बैठकीच्या अनुषंगाने पत्रकाराशी ते बोलत होते.
पुणे आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकांप्रमाणेच अहिल्यानगर जिल्हा बॅकेच्या हितासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येणे काळाची गरज आहे. सहकारात जेवढे राजकारण कमी होईल, तेवढा शेतकऱ्यांचा फायदा होईल. बॅकेच्या आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी गरज पडल्यास आम्हीही चर्चेसाठी पुढाकार घेऊ, असे आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट केले.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर बोलताना आमदार रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर तीव्र संताप व्यक्त केला. “वास्तविक पाहता दुष्काळी पंचनामे ऑगस्ट महिन्यातच होणे आवश्यक होते; मात्र सत्ताधारी केवळ राजकारणात मग्न होते. सरकार ५ ऑक्टोबरची तारीख निश्चित करून बसले होते. परंतु जनतेचा वाढता रोष, विरोधकांचे रस्त्यावरील आंदोलन आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी थेट पत्र लिहिल्यानंतर सरकारला जाग आली आणि त्यांनी १० दिवस आधी पंचनामे सुरू केले. आता केवळ पंचनामे न करता बाधित सर्व तालुक्यांना शासनाने विनाविलंब आर्थिक मदत जाहीर करावी,” अशी मागणी त्यांनी केली.
राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांवर भाष्य करताना ते म्हणाले की, “सत्ताधारी पक्षात गेल्यास सामान्य जनतेची कामे होतील या आशेने काही कार्यकर्ते तिकडे गेले होते. मात्र, आज केवळ सत्ताधारी नेते आणि आमदारांचाच विकास होत असून सर्वसामान्यांचे प्रश्न वाऱ्यावर सोडले गेले आहेत, ही वस्तुस्थिती कार्यकर्त्यांच्या लक्षात आली आहे. त्यामुळे पूर्वी इतर पक्षात गेलेले नेते व कार्यकर्ते आता पुन्हा एकदा फुले-शाहू-आंबेडकर आणि शरद पवार यांच्या विचारधारेकडे परत येत आहेत." याच पार्श्वभूमीवर कोपरगाव व राहाता परिसरात ऑनलाइन सदस्य नोंदणी अभियानाला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.
जिल्ह्यातील मातब्बर नेते महायुतीसोबत असताना पक्षाची पुढील रणनीती काय, या प्रश्नावर उत्तर देताना रोहित पवार म्हणाले, “केवळ साखर कारखाने किंवा शिक्षण संस्था ताब्यात असणे म्हणजेच नेतृत्व नव्हे; जनता ज्याच्या पाठीशी उभी राहते, तोच खरा लोकनेता असतो. आम्ही सातत्याने जनतेचे प्रश्न पोटतिडकीने मांडत असल्याने लोक आमच्याशी जोडले जात आहेत.
तर, २०२९ पर्यंत राज्यातील जनता घराणे आणि प्रस्थापितांऐवजी लोकांसाठी लढणाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. उद्या या लढ्यातूनच कोणताही सामान्य कार्यकर्ता आमदार किंवा खासदार झालेला पाहायला मिळेल,” असा दावा देखील आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला.