​नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करा - आमदार अमोल खताळ

संगमनेर Live
0
​नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करा - आमदार अमोल खताळ

◻️ ​साकूर पठारावरील दुष्काळसदृश परिस्थितीची प्रत्यक्ष बांधावर जाऊन केली पाहणी


​संगमनेर LIVE (अनिल शेळके) | पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे आणि दुष्काळसदृश परिस्थितीमुळे खरीप पिके करपून गेल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्‍वभूमीवर, महसूल व कृषी विभागाने कोणत्याही किचकट अटी वा निकषांचा अडसर न आणता पिकांचे तातडीने सरसकट व पारदर्शक पंचनामे करावेत. शासकीय मदतीपासून तालुक्यातील एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची प्रशासनाने काटेकोर खबरदारी घ्यावी, असे स्पष्ट निर्देश आमदार अमोल खताळ यांनी दिले.

​आमदार खताळ यांनी गुरुवारी (दि. १) तालुक्यातील साकूर पठार परिसरातील हिवरगाव पठार, सुतारवाडी, पायरवाडी, कौठे मलकापूर, कुंभारवाडी, जांभूळवाडी आणि पिंपळगाव देपा या गावांना प्रत्यक्ष भेट देऊन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. यावेळी तहसीलदार धीरज मांजरे, गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे, तालुका कृषी अधिकारी रेजा बोडके यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी तसेच महायुतीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

​पावसाने पाठ फिरवल्याने पठार भागातील मका, सोयाबीन, बाजरी यांसारखी प्रमुख पिके करपून गेली असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू पाहता प्रशासनाने कागदी घोडे न नाचवता संवेदनशीलता दाखवणे गरजेचे आहे. नुकसानीची यादी तयार करताना कोणताही शेतकरी सुटणार नाही याची दक्षता अधिकाऱ्यांनी घ्यावी, तसेच स्थानिक कार्यकर्त्यांनीही या प्रक्रियेवर लक्ष ठेवावे, अशा सूचना आमदार खताळ यांनी केल्या.

​“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे कोणताही भेदभाव न करता सरसकट पंचनामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. हा पंचनामा अहवाल प्राप्त होताच नुकसानभरपाईसाठी शासनस्तरावर आक्रमक पाठपुरावा करण्यात येईल. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदतीची रक्कम त्यांच्या बॅक खात्यावर जमा व्हावी, यासाठी आम्ही कटिबध्द आहोत.” अशी ग्वाही देखील आमदार अमोल खताळ यांनी दिली.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !