​श्रीलंका ते एकरुखे-शिर्डी भव्य मशाल पदयात्रेला उत्साहात प्रारंभ!

संगमनेर Live
0

​श्रीलंका ते एकरुखे-शिर्डी भव्य मशाल पदयात्रेला उत्साहात प्रारंभ!

◻️ ​डॉ. सुजय विखे पाटलांच्या हस्ते ज्योत प्रज्वलित; २२ वर्षांची अखंड परंपरा


संगमनेर LIVE (​श्रीलंका) | नवरात्रोत्सवाच्या पावन पर्वावर श्रीलंकेतील ऐतिहासिक ‘श्री क्षेत्र इंद्राक्षी माता मंदिर’ (जाफना) येथून महाराष्ट्रातील ‘श्री क्षेत्र एकरुखे-शिर्डी' येथील श्री वज्रेश्‍वरी मातेच्या चरणी येणाऱ्या भव्य ‘शक्तीज्योत’ पदयात्रेला भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. श्री वज्रेश्वरी प्रतिष्ठान, एकरुखे यांच्या वतीने गेल्या २२ वर्षांपासून ही अखंड परंपरा जोपासली जात असून, यंदा ही यात्रा २७ सप्टेंबर ते १९ ऑक्टोबर या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.

​जाफना येथील पवित्र इंद्राक्षी माता मंदिरात माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या शुभहस्ते विधिवत पूजन करून ही शक्तीज्योत प्रज्वलित करण्यात आली. यावेळी श्री वज्रेश्‍वरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष देवेंद्र भवर पाटील यांच्यासह प्रतिष्ठानचे पदयात्री युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​श्रीलंकेतील जाफना परिसरातील नैनातिवु बेटावरील प्रसिध्द ‘नागपूषणी अम्मन’ मंदिराशी इंद्राक्षी देवी परंपरेचा थेट संबंध जोडला जातो. आदिशक्तीच्या विविध रूपांची आराधना होत असताना, श्रीलंकेतील हे स्थान शक्ती, श्रध्दा आणि भक्तीचे अढळ प्रतीक मानले जाते. आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून सुरू झालेली ही मशाल ज्योत पदयात्रा सांस्कृतिक एकात्मतेचा आणि अथांग श्रध्देचा प्रत्यय घडवून आणत आहे.

​ज्योत प्रज्वलन प्रसंगी मनोगत व्यक्त करताना डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, “या यात्रेचा संकल्प आमचा सर्वांचा आहे. ही पवित्र शक्तीज्योत एकरुखे येथे पोहोचेपर्यंत सर्वत्र चांगला पाऊस पडून शेतकरी सुखी व्हावा, हीच देवीचरणी प्रार्थना आहे. शिर्डीचे साईबाबा आणि श्री वज्रेश्‍वरी मातेचा आशीर्वाद या पदयात्री युवकांच्या पाठीशी सदैव राहील.”

​श्रीलंका ते राहाता-एकरुखे असा खडतर प्रवास करणाऱ्या सर्व युवकांना विखे पाटील परिवाराच्या वतीने शुभेच्छा देताना त्यांनी आवाहन केले की, “युवकांनी या यात्रेच्या निमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक स्थळांशी जोडले जात अशा वैभवशाली परंपरा पुढे चालू ठेवाव्यात.”

दरम्यान, ​श्रीलंकेतील जाफना येथून निघालेली ही मशाल ज्योत विविध मार्ग पार करत १९ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील श्री क्षेत्र एकरुखे-शिर्डी येथे पोहोचेल. तेथे श्री वज्रेश्‍वरी मातेच्या चरणी ही ज्योत भक्तीभावाने अर्पण केली जाईल. गेली दोन दशके अविरतपणे सुरू असलेल्या या पदयात्रेमुळे संपूर्ण परिसरात सध्या उत्साहाचे आणि मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !