“नम्रता, नीती आणि सेवा हाच खरा परमार्थ” - महंत उध्दव महाराज मंडलिक

संगमनेर Live
0
“नम्रता, नीती आणि सेवा हाच खरा परमार्थ” - महंत उध्दव महाराज मंडलिक

◻️ ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांच्या हस्ते कै. विठ्ठलराव आंधळे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त सांस्कृतिक भवनाचे लोकार्पण


संगमनेर LIVE (अनिल शेळके) | “माणूस पदाने, संपत्तीने किंवा अधिकाराने कितीही मोठा झाला, तरी त्याच्या ठायी नम्रता असणे हीच त्याची खरी ओळख असते. समाजात वावरताना तुम्ही कितीही मोठे अधिकारी वा प्रतिष्ठित असा; पण घराच्या उंबरठ्यावर आपले पद व अहंकार बाजूला ठेवून केवळ आई-वडिलांचा मुलगा, पती, भाऊ किंवा पिता या नात्याने वागले पाहिजे, तरच घरामध्ये सुख-शांती नांदू शकते,” असे अमृततुल्य मार्गदर्शन महंत ह.भ.प. उध्दव महाराज मंडलिक यांनी केले.

प्रतापपूर (ता. संगमनेर) येथील सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रांत प्रदीर्घ काळ सक्रिय राहिलेले जुन्या काळातील ध्येयवादी व्यक्तिमत्त्व कै. विठ्ठलराव आंधळे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त शुक्रवारी (दि. २) आयोजित कीर्तन सेवेत महंत उध्दव महाराज मंडलिक बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते दिनकरराव आंधळे आणि आंधळे कुटुंबाने स्वखर्चातून ग्रामस्थांच्या सोयीसाठी उभारलेल्या सांस्कृतिक भवनाचे लोकार्पण केले. पांडुरंग घुले, राधाकृष्ण आंधळे, दिनकरराव आंधळे, रावसाहेब म्हस्के, दिलिप शिंदे, आबासाहेब थोरात, गणपत सांगळे, बाळासाहेब गायकवाड, ज्ञानेश्‍वर आंधळे, संजय आंधळे यांच्यासह तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, उद्योग आणि कृषी क्षेत्रातील अनेक मान्यवरांसह संपूर्ण आंधळे कुटुंबिय, नातेवाईक आप्तेष्ट यावेळी उपस्थित होते.

​संत तुकाराम महाराजांच्या ‘लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा’ या उक्तीचा संदर्भ देत महंत मंडलिक महाराज म्हणाले की, “प्रभू श्रीरामाने विश्‍वमित्राच्यां यज्ञाचे रक्षण करताना राजपुत्र असल्याचा कोणताही अहंकार न बाळगता एका द्वारपालाची भूमिका नम्रतेने स्वीकारली होती. ज्याला मोठे व्हायचे असते, त्याने लहान होण्यास कधीही लाजू नये. वारी असो वा परमार्थ, तिथे कोणतीही ‘व्हीआयपी’ संस्कृती चालत नाही. विठ्ठलाच्या दरबारात लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना समान अधिकार आहे.”

​परमार्थाची सोपी व्याख्या समजावून सांगताना महाराजांनी डॉक्टर आणि गुन्हेगाराचे उदाहरण दिले. “दोघांच्याही हातात शस्त्र असते; मात्र डॉक्टरच्या शुध्द हेतूमुळे रुग्णाला जीवनदान मिळते, तर गुन्हेगाराच्या हेतूमुळे अनर्थ घडतो. म्हणूनच कृतीमागील हेतू उदात्त असणे आवश्यक आहे. आई-वडिलांची सेवा, गोरगरिबांना साहाय्य आणि मुक्या प्राण्यांवर दया करणे हाच खरा धर्म आहे,” असे सांगितले.

​महाभारताचा दाखला देत महाराज पुढे म्हणाले की, “संकटकाळात एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हीच खरी कुटुंबाची ताकद असते. भौतिक सुखांच्या मागे धावताना माणसांमधील जिव्हाळा, नीती आणि कृतज्ञतेची भावना टिकवून ठेवणे काळाची गरज आहे. ज्यांनी आपल्यासाठी आयुष्यभर खस्ता खाल्ल्या, त्या पूर्वज, आई-वडील आणि हितचिंतकांविषयी कृतज्ञ राहणे हाच जीवनाचा खरा पाया आहे.” असे देखील नमूद केले.

कीर्तनादरम्यान कै. विठ्ठलराव आंधळे यांच्या कार्याचा गौरव करताना उध्दव महाराज म्हणाले “त्यांनी प्रतिकूल काळात पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्यासोबत १९५० पूर्वीच्या काळात गुऱ्हाळाचे काम सांभाळून सहकार चळवळीच्या सुरुवातीच्या टप्प्यात मोलाचे योगदान दिले होते. तसेच त्यांच्या बंधूंनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता म्हणून मुळा धरणाच्या बांधकामात मोलाची भूमिका बजावली होती. अशा समृध्द वारशाची जपणूक करत आंधळे कुटुंबीयांची आजची पिढीही शेती, नोकरी, व्यवसाय आणि सामाजिक कार्यात सक्रिय राहून आदर्श वाटचाल करत असल्याचे गौरवोद्गार काढले.

“विठ्ठल नानाच्या संस्कारांतून घडलेल्या संपूर्ण आंधळे कुटुंबाने दातृत्वातून समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. त्यांच्या स्मरणार्थ उभारलेले सांस्कृतिक सभागृह ग्रामविकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. तसेच सध्याचे वर्ष अत्यंत कठीण असून भीषण पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले आहे. धरणांतील पाणी साठ्यामुळे आज काहीसा दिलासा दिसत असला, तरी येत्या काळात जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न भेडसावणार आहे. अशा परिस्थितीत इतर खर्च टाळून तो निधी दुष्काळात गोधन वाचवण्यासाठी व चारा-पाण्याची व्यवस्था करण्यासाठी खर्ची घालावा.” असे आवाहन यावेळी ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !