बिझनेस एक्स्पोमधून विकसित भारताची पायाभरणी - मंत्री विखे पाटील

संगमनेर Live
0
बिझनेस एक्स्पोमधून विकसित भारताची पायाभरणी - मंत्री विखे पाटील

◻️ १७५ स्टॉलमधून विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक दृष्टिकोनाचे कौतुक 


संगमनेर LIVE (लोणी) | प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षांपासून राबविण्यात येत असलेला ‘बिल्डिंग प्रवरा’ उपक्रम विद्यार्थ्यांना नवा आत्मविश्‍वास देणारा आणि विकसित भारताची पायाभरणी करण्यासाठी उपयुक्त करेल असे प्रतिपादन जलसंपदा तथा पालक मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील केले.

लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने ‘बिल्डिंग प्रवरा’ संकल्पनेतून विद्यार्थ्यांच्या सहभागाने आयोजित करण्यात आलेल्या बिझनेस एक्सोला मंत्री  राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या उपक्रमाच कौतुक केले. संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुस्मिता विखे पाटील यांच्या संकल्पनेतून सलग तिसऱ्या वर्षी विद्यार्थ्याचा बिझनेस एक्स्पो आयोजित करण्यात आला आहे.

 प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एन. मगरे, ट्रक वाहतूक संस्थेचे चेअरमन नंदूशेठ राठी, सुनील जाधव, सहसचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, डॉ. प्रदीप दिघे, सौ. लिलावती सरोदे, डॉ. उत्तमराव कदम, डॉ. महेश खर्डे, डाॅ. आर. ए. पवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

या बिझनेस एक्स्पोमध्ये सुमारे १७५ स्टॉल उभारण्यात आले आहेत. रंगीबेरंगी आणि आकर्षक असे फिश आणि फिश टॅंक आणि या फिश टॅंक ला सौरऊर्जा, स्वदेशी उत्पादने, अन्नतंत्रज्ञान, सेंद्रिय उत्पादने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, खाद्यपदार्थ, हस्तकला, सजावटीच्या वस्तू यांसह विविध उत्पादनांचे विद्यार्थ्यांनी प्रदर्शन व विक्री केली आहे. दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर पणत्या, रांगोळ्या, कपडे, सजावटीचे साहित्य, सेंद्रिय उदबत्त्या, धूप तसेच विविध घरगुती उत्पादने, विविध खाद्यपदार्थांची रेलचेल  विविध गेम्स ग्राहकांचा प्रतिसाद मिळत आहे. 

कृषी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी फळभाज्या, फुलझाडे व विविध रोपांच्या विक्रीला प्राधान्य दिले आहे. सेंद्रिय गूळ, गावरान तूप, दूध उत्पादनासाठी उपयुक्त खाद्यपदार्थ तसेच घरगुती व्यवसायातून तयार केलेल्या वस्तूंनाही ग्राहकांची पसंती मिळत आहे. 

बिझनेस एक्स्पोच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी केवळ उत्पादनांची विक्री न करता त्यामागील संकल्पना, बाजारपेठेचा अभ्यास, ग्राहकांची गरज आणि विपणन कौशल्य यांचेही दर्शन घडविले. नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रत्येक स्टॉलला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. उत्पादनाची संकल्पना, बाजारपेठ, विक्रीचे नियोजन आणि भविष्यातील व्यवसायाच्या संधी याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांकडून माहिती घेतली. काही स्टॉलवरील उत्पादनांची स्वतः खरेदीही त्यांनी केली.

सलग तिसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल नामदार विखे पाटील यांनी आयोजन समितीचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि त्यांच्या व्यवसाय संकल्पना अभ्यासपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले आहे. स्थानिक पातळीवर उत्पादित होणाऱ्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची दिशा या बिझनेस एक्स्पोमधून दिसून येत असल्याचेही नामदार विखे पाटील यांनी सांगितले. 

रविवार पर्यंत सुरू असणाऱ्या बिल्डिंग प्रवरा या उपक्रमामध्ये सर्वांनी सहभागी होऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन डॉ. सुस्मिता विखे पाटील यांनी केले आहे.

प्रवेशद्वारावरील देखावे ठरले आकर्षण..

बिझनेस एक्स्पोच्या प्रवेशद्वारावर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जीवनपट साकारण्यात आला असून हा देखावा लक्षवेधी ठरत आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ संकल्पनेवर आधारित ‘विकसित प्रवरा’ हा देखावाही प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !