“ग्रामीण खेळाडू जिद्दीने इतिहास घडवत आहेत” - पालकमंत्री विखे पाटील
◻️ जिल्ह्याचा भूमिपुत्र अस्लम इनामदारचा लोणीत सत्कार; सलग दुसऱ्यांदा पटकावले सुवर्णपदक!
संगमनेर LIVE (लोणी) | आशियाई क्रीडा स्पर्धेत कबड्डी खेळात दुसऱ्यांदा सुवर्णपदक मिळविलेल्या अहिल्यानगरचा भूमिपुत्र अस्लम इनामदार याची खेळातील कारकीर्द सुवर्णविजयी आणि सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याची प्रतिक्रिया जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभानचा भूमिपुत्र अस्लम इनामदार याने आशियाई क्रीडा स्पर्धेत कबड्डी संघामध्ये प्रतिनिधित्व करून सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक पटकावण्याचा मान मिळविला आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अस्लम इनामदार याचा लोणी येथे सत्कार करून त्याचे विशेष अभिनंदन केले.
या प्रसंगी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे यांच्यासह अस्लमचे नातेवाईक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
“सातत्यपूर्ण सरावाच्या बळावर क्रीडा क्षेत्रात अस्लम इनामदार आणि त्याच्या संघाने भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवला. हे यश अहिल्यानगरच्या क्रीडा संस्कृतीचे, त्याच्या कुटुंबीयांचे आणि प्रशिक्षकांचे आहे. अहिल्यानगरचा भूमिपुत्र आशियाच्या मैदानावर इतिहास घडवतो, ही सर्वांच्या दृष्टीने अभिमानास्पद घटना आहे,” असे विखे पाटील म्हणाले.
ग्रामीण भागातील खेळाडू आपल्या मेहनतीने आणि जिद्दीने नावलौकिक मिळवत असल्याचे सांगून, “यापूर्वी अस्लमला प्रथम सुवर्णपदक मिळाले तेव्हा टाकळीभान येथे त्याच्या नागरी सत्कार समारंभास आपण आवर्जून उपस्थित होतो,” अशी आठवण त्यांनी सांगितली. अस्लमचे यश हे जिल्ह्यातील खेळाडूंसाठी अतिशय प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.
“अनेक खेळाडू जिल्ह्यातून विविध स्पर्धांत सहभागी होत आहेत. शहर आणि ग्रामीण खेळाडूंमधील दरी आता कमी होत आहे. योग्य संधी, प्रशिक्षण आणि प्रोत्साहन मिळाले तर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू देशाचे नाव उज्ज्वल करू शकतात, हा आत्मविश्वास अस्लम इनामदार याच्या यशाने सर्वांना दिला आहे,” असेही मंत्री विखे पाटील म्हणाले.