प्रवरा अभिमत विद्यापीठात ३ ते ५ ऑक्टोबर दरम्यान राष्ट्रीय क्रिडा स्पर्धांचे आयोजन
◻️ साईबाबा संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांच्या हस्ते शनिवारी उध्दघाटन
संगमनेर LIVE (लोणी) | प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, लोणी या प्रवरा अभिमत विद्यापीठात वैद्यकीय महाविद्यालयांच्या राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ३ ते ५ ऑक्टोबर या तीन दिवसांच्या कालावधीत फुटबॉल, बास्केटबॉल, बॅडमिंटन, टेबल टेनिस आणि पॉवरलिफ्टिंग या विविध क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा रंगणार आहेत. प्रवरा अभिमत विद्यापीठाचे विश्वीशस्त ध्रुव विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती क्रीडा संचालक डॉ. सुनील बुलार यांनी दिली.
या स्पर्धांचे उध्दघाटन शनिवार, दि. ३ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता सरस्वती हॉल येथे श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील राहणार असून, कुलगुरू डॉ. व्ही. एन. मगरे आणि अधिष्ठाता डॉ. सतीश महाजन यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये विविध वैद्यकीय महाविद्यालयांतील विद्यार्थी सहभागी होणार आहेत. कर्नाटक, राजस्थान, गुजरात या राज्यांसह बेळगाव, बडोदा, कोल्हापूर, सांगली, कराड, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, जळगाव, अहिल्यानगर आणि मुंबई आदी शहरांतील वैद्यकीय महाविद्यालयांच्या संघांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे.
दरम्यान, तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धांमुळे प्रवरा परिसरात क्रीडाप्रेमींना राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंच्या कौशल्याचा थरार अनुभवता येणार आहे. स्पर्धेची जय्यत तयारी पूर्ण झाली असून, सहभागी संघांचे स्वागत आणि स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यापीठ प्रशासन व क्रीडा विभाग सज्ज असल्याचे डॉ. सुनील बुलार यांनी सांगितले.