१५७ ‘बापू’ आणि १०० ‘कस्तुरबां’च्या वेशभूषेतील चिमुकल्यांची लक्षवेधी प्रभातफेरी
◻️ नैतिकता व निर्भयतेची आज देशाला नितांत गरज - डॉ. सुधीर तांबे
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | वेगवेगळ्या ५०० हून अधिक संस्थानांमध्ये विभागलेल्या देशाला एका सूत्रात बांधून, गोरगरीब व सर्वधर्मीय जनतेला सोबत घेत स्वातंत्र्य मिळवून देण्याचे ऐतिहासिक कार्य राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी केले. नैतिकता आणि निर्भयता ही त्यांची जीवनमूल्ये जगासाठी आजही दीपस्तंभ असून, त्यांच्यामुळेच जगामध्ये भारताची मोठी ओळख निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त ‘जयहिंद लोकचळवळी'च्या वतीने संगमनेर शहरात भव्य प्रभातफेरी व गांधी भजनांच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या ‘यशोधन’ जनसंपर्क कार्यालयापासून या प्रभातफेरीला उत्साहात सुरुवात झाली. महात्मा गांधी यांच्या वेशभूषेतील १५७ विद्यार्थी आणि कस्तुरबा गांधी यांच्या वेशभूषेतील १०० विद्यार्थिनी हे या प्रभातफेरीचे मुख्य आकर्षण ठरले. हातात तिरंगा, मुखात ‘वंदे मातरम्’, ‘भारत माता की जय’च्या गगनभेदी घोषणा आणि बापूंची भजने गात निघालेल्या या चिमुकल्यांनी संपूर्ण नाशिक-पुणे रस्त्यावरील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. या फेरीत डॉ. सुधीर तांबे, सौ. दुर्गा तांबे आणि नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे स्वतः पायी सहभागी झाल्या होत्या.
संगमनेर बसस्थानकावर आयोजित मुख्य अभिवादन सभेत बोलताना डॉ. तांबे म्हणाले, “जगामध्ये महात्मा गांधी आणि भगवान गौतम बुध्द यांच्या तत्त्वज्ञानामुळेच भारताची खरी ओळख निर्माण झाली आहे. असहकार चळवळ, मिठाचा सत्याग्रह आणि चलेजाव या राजकीय आंदोलनांसोबतच त्यांनी २१ विधायक सामाजिक चळवळी राबवल्या. सध्या देशामध्ये सत्य आणि असत्याची लढाई सुरू असून गांधी विचारांबद्दल जाणीवपूर्वक अपप्रचार केला जात आहे. मात्र, गांधींचे विचार कधीही संपवता येणार नाहीत. सध्याच्या सत्ताधाऱ्यांमध्ये नैतिकतेचा अभाव दिसत असून, जागतिक शांतता आणि मानवकल्याणासाठी गांधी विचार जपणे हीच काळाची गरज आहे.” असे आवाहन केले.
याप्रसंगी प्रा. हिरालाल पगडाल यांनीही विचार मांडताना आजच्या काळात बुध्द आणि गांधी यांच्या शांतीमार्गाची निकड अधोरेखित केली. तसेच सौ. दुर्गा तांबे यांनी बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली गांधी विचार तळागाळात नेण्याचा संकल्प व्यक्त केला.
बसस्थानक परिसरातील मुख्य कार्यक्रमात विविध कलात्मक उपक्रम आणि सुश्राव्य भजनांनी संपूर्ण वातावरण भारावून टाकले होते.
यावेळी तुषार भोसले यांनी महात्मा गांधी यांची सुबक रांगोळी रेखाटली, सुगंध जाधव यांनी बापूंचे हुबेहूब व्यक्तिचित्र साकारले, तर ओंकार मोरे व कृष्णा चव्हाण यांनी उपस्थित विद्यार्थ्यांसमोर गांधीजींची सुंदर मूर्ती घडवून उपस्थितांची मने जिंकली.
याच व्यासपीठावर प्रा. विनोद राऊत, अविनाश कदम, गणेश गोरडे, मंगेश बिडवे व सौरभ रणधीर यांनी ‘रघुपती राघव राजाराम’, ‘वैष्णव जन तो’, ‘साबरमती के संत’, ‘आज का दिन बडा महान’ आणि ‘माझे माहेर पंढरी’ ही राष्ट्रपित्यास प्रिय असणारी भजने सादर केली. या भजनांच्या सुरांमध्ये संगमनेरकर नागरिक पूर्णतः तल्लीन झाले होते.
या सोहळ्यास प्रा. बाबा खरात, डॉ. नामदेवराव गुंजाळ, प्रा. प्रकाश पारखे, डॉ. बाळासाहेब वाघ, एस. एम. खेमनर, ॲड. मधुकर गुंजाळ, सुरेश झावरे, निखिल पापडेजा, अनंत शिंदे, हर्षल थेटे, चांगदेव खेमनर यांच्यासह शहरातील नागरिक, महिला, युवक आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रकाश पारखे यांनी केले, सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी तर आभारप्रदर्शन डॉ. नामदेवराव गुंजाळ यांनी केले.