ठाकरे बंधूंचे आंदोलन म्हणजे पत मिळवण्यासाठीची ‘केविलवाणी धडपड’
◻️ मंत्री विखे पाटलांची ठाकरे बंधू सह सीजेपी वर घणाघाती टिका
संगमनेर LIVE (लोणी) | निवडणूक आयोगाच्या विरोधात ठाकरे बंधूंचे आंदोलन म्हणजे गमावलेली पक्षाची पत पुन्हा मिळवण्यासाठी सुरू केलेली केविलवाणी धडपड आहे; जे केजरीवाल बोलतात तेच सीजेपी बोलत असल्याने हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात पुरस्कृत केलेले आंदोलन आहे, अशी टीका जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
माध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, दिल्लीतील आंदोलनानंतर संपूर्ण देशात लोकप्रियता वाढेल, असा सीजेपीचा झालेला भ्रम आता दूर झाला असेल. जे केजरीवाल बोलतात तेच सीजेपीचे आंदोलक बोलतात. त्यामुळे हे पुरस्कृत केलेले आंदोलन फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाला बदनाम करण्यासाठीच सुरू असल्याचे विखे पाटील म्हणाले.
आंदोलनात वेळ घालवण्यापेक्षा सरकारच्या खांद्याला खांदा लावून मदत करण्यासाठी पुढे आलात, तर शेतकरी तुम्हाला दुवा देतील. पण यांना काहीच करायचे नाही. हे कोणतीही मदत शेतकऱ्यांना करू शकणार नाहीत. कोविडच्या संकटात शेतकऱ्यांना हे काही देऊ शकले नाहीत, तर आता काय देणार? असा सवाल मंत्री विखे पाटील यांनी केला.
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्री बांधावर जाऊन शेतकऱ्यांना आधार देत आहेत. महायुती सरकार हे देणारे सरकार असल्याने शेतकऱ्यांना मदत करण्यात कुठेही कमी पडणार नाही. एनडीआरएफच्या आधी राज्य सरकार भरघोस मदत करेल, अशी ग्वाही मंत्री विखे पाटील यांनी दिली.