​महिलांचा सहभाग हा पर्याय नव्हे, तर सहकाराचा भक्कम आधार - मंत्री विखे पाटील

संगमनेर Live
0
महिलांचा सहभाग हा पर्याय नव्हे, तर सहकाराचा भक्कम आधार - मंत्री विखे पाटील

◻️ ​शिर्डीत सहकार भारतीच्या ‘नारीशक्ती आणि सहकारिता अधिवेशना’चे उध्दघाटन 


संगमनेर LIVE (अनिल शेळके) | महिलांचा सहभाग सहकार क्षेत्रासाठी केवळ पर्याय नाही तर सहकाराच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक असलेला आधार आहे, असे प्रतिपादन जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

सहकार भारतीच्या वतीने शिर्डी येथे दोन दिवसांच्या 'नारीशक्ती आणि सहकारिता अधिवेशनाचे' उध्दघाटन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय जोशी, राष्ट्रीय महिला अध्यक्षा सौ. रेवती शेंदूर्णीकर, प्रदेशाध्यक्ष दत्तारामजी चावके, महिला प्रदेशाध्यक्षा सौ. वैशाली आवाडे, महामंत्री विवेक जुगादे, संघटन मंत्री संजय पाचपोर आणि उपाध्यक्ष रवीकाका बोरावके उपस्थित होते.

आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की, देशाच्या अर्थव्यवस्थेत नारीशक्तीचा सहभाग महत्त्वाचा ठरत असून शेती, उद्योग, बॅकिंग आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रासह सहकार चळवळीत यशस्वी नेतृत्व करण्याची क्षमता आमच्या नारीशक्तीमध्ये आहे.

“बचत गटाच्या चळवळीतून महिलांनी आर्थिक उलाढालीचा इतिहास निर्माण केला आहे. बचत गटांच्या चळवळींना सहकार क्षेत्राशी जोडून महिलांना संधी दिल्यास ग्रामीण अर्थव्यवस्थेचे चित्र बदलू शकते,” असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. तसेच बचत गटांना दिलेल्या कर्जाची वसुली शंभर टक्के आहे, त्यामुळे बॅकिंग क्षेत्रात शिस्त आणायची असेल तर महिलांना अधिक संधी देण्याची अपेक्षा मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सहकार मंत्रालय स्थापन झाल्यानंतर केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी सहकार क्षेत्रातील अमूलाग्र बदलांमध्ये महिलांना प्राधान्य दिले आहे. सहकार चळवळीत महिलांचा सहभाग वाढवायचा असेल, तर सहकार भारतीने प्राथमिक सहकारी सोसायट्यांच्या कार्यप्रणालीबाबत सुध्दा काम सुरू करावे, असे मंत्री विखे पाटील यांनी सूचित केले.

राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून महिलांसाठी सुरू असलेल्या योजनांची माहिती दिली. “सहकारातून समृध्दी" हे ब्रीद घेऊन केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून निर्णय होत आहेत. 

महिला सक्षमीकरणासाठी तीन कोटी 'लखपती दीदी' बनवण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी राज्य सहकारी बॅकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, सहकार भारतीच्या महिला प्रदेशाध्यक्षा सौ. वैशाली आवाडे व महामंत्री विवेक जुगादे यांचीही भाषणे झाली. अधिवेशनाच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !