“पेपरफुटीचा आका कोण? आधी त्याला बेड्या ठोका” - बाळासाहेब थोरात
◻️ पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला काॅग्रेसचा पाठिंबा
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | “रात्रंदिवस काबाडकष्ट करून अभ्यास करणाऱ्या गोरगरिबांच्या मुलांचे भविष्य उद्ध्वस्त करून भ्रष्टाचाऱ्यांना नोकऱ्या विकल्या जात आहेत. वारंवार पेपर फुटतातच कसे? या पेपरफुटीमागे नेमका कोणाचा वरदहस्त आहे? त्या ‘आका’चा शोध घेऊन त्याला आधी गजाआड करा,” अशी घणाघाती टीका काॅग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केली
पुण्यात सुरू असलेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या राज्यव्यापी आंदोलनाला बाळासाहेब थोरात यांनी प्रत्यक्ष भेट देऊन काॅग्रेस पक्षाच्या वतीने संपूर्ण पाठिंबा जाहीर केला. यावेळी आमदार रोहित पवार, काॅग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम, माजी आमदार मोहन जोशी, शिवराज मोरे यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित होते.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना थोरात म्हणाले, “सामान्य आणि शेतकरी कुटुंबातील आई-वडील पोटाला चिमटा काढून मुलांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी शहरात पाठवतात. मुलेही जिद्दीने रात्रंदिवस अभ्यास करतात; मात्र परीक्षा आली की अचानक पेपर फुटतो. यामुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांचा पूर्ण भ्रमनिरास होतो. जे अभ्यास करतात ते नापास आणि जे भ्रष्टाचार करतात ते पास, असा संतापजनक प्रकार सध्या राज्यात सुरू आहे. या गैरप्रकारांमुळे राज्य सरकारच्या हेतूवरच मोठी शंका निर्माण झाली आहे.” दिवंगत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी पोलीस भरतीत पारदर्शकता आणि शिस्त आणली होती, मात्र सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या काळात पुन्हा गैरप्रकार बोकाळण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.
राज्यातील शासकीय भरती प्रक्रियेच्या ढिसाळ कारभारावर आसूड ओढताना थोरात पुढे म्हणाले की, आज राज्यात तब्बल ७० हजार शासकीय पदे रिक्त पडून आहेत, तरीही सरकार भरती करण्यास टाळाटाळ करत आहे. कृषी विद्यापीठांमध्ये ७० टक्के पदे रिक्त असून केवळ ३० टक्के मनुष्यबळावर संपूर्ण कारभार हाकला जात आहे. शाळा आणि महाविद्यालयांमध्येही अवघे ३० टक्के शिक्षक उपलब्ध असल्याने देशाची भावी पिढी कशी घडणार आणि गरिबांची मुले पुढे कशी जाणार, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. परीक्षा पार पडल्यानंतरही दोन ते तीन वर्षे निकाल लागत नाहीत. युवाशक्ती हे देशाचे खरे भांडवल असताना, त्यांच्या ऊर्जेचा योग्य वापर करण्याऐवजी हे सरकार त्यांच्या भवितव्याशी क्रूर खेळ खेळत असल्याचा आरोप त्यांनी केला.
मुख्यमंत्र्यांनी या आंदोलनाला ‘कायद्याचा प्रश्न’ ठरवल्याचा खरपूस समाचार घेताना थोरात म्हणाले, “हा केवळ कायद्याचा नाही, तर संवेदनशीलतेचा आणि नैतिकतेचा प्रश्न आहे. एका रेल्वे अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी रेल्वेमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. या सरकारने केलेल्या अनागोंदीमुळे त्यांनी आतापर्यंत शंभर वेळा राजीनामा द्यायला हवा होता. हे सरकार सत्तेत राहण्याच्या पात्रतेचे नाही.” असा घणाघात त्यांनी केला.
“देशात लोकशाही आणि संविधान अबाधित ठेवायचे की नाही, हे ठरवण्याची ताकद आता तरुणांच्या हातात आहे. महाराष्ट्रातील तरुणांनी देशाला नेहमीच नवी दिशा दिली आहे. अन्यायाविरुध्द उभी राहिलेली ही लढाई म्हणजे दुसरी स्वातंत्र्य चळवळच असून या संघर्षात आम्ही पूर्ण ताकदीने विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठाम उभे आहोत," असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी विद्यार्थ्यांना दिला.