लाल वादळ मुंबईच्या वेशीवर! शेतकऱ्यांचा 'वाहन लाँग मार्च' कसारा घाट पार
◻️ आज सायंकाळी 'सह्याद्री'वर मुख्यमंत्र्यांसोबत शिष्टमंडळाची निर्णायक बैठक
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने काढण्यात आलेला भव्य ‘वाहन लाँग मार्च’ कसारा घाट पार करून आता मुंबईच्या दिशेने वेगाने पुढे सरकत आहे. हजारो वाहनांचा ताफा आणि शेतकरी मुंबईच्या वेशीवर दाखल होत असतानाच, राज्य सरकारने या आंदोलनाची गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किसान सभेच्या नेतृत्वाला चर्चेचे अधिकृत निमंत्रण दिले असून, आज मंगळवारी सायंकाळी मुंबईतील ‘सह्याद्री’ अतिथीगृहावर ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे.
शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह राज्य सरकारमधील तब्बल सहा प्रमुख मंत्री उपस्थित राहणार आहेत. शेतकरी कर्जमाफी, वनजमीन हक्क, शेतीमालाला हमीभाव, ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’, ‘लाडकी बहीण’, आशा व अंगणवाडी सेविका, पेसा कर्मचारी, पोषण आहार व बांधकाम कामगारांना वेतन, वनजमिनी, गायरान, देवस्थान व इनाम जमिनी आणि इतर मागण्यांवर या बैठकीत सविस्तर तोडगा काढण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे.
दुसरीकडे, किसान सभेनेही सरकारच्या चर्चेच्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. चर्चेची दारे खुली असली तरी मागण्यांवर ठोस निर्णय झाल्याशिवाय माघार घेणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.
मुख्यमंत्र्यांसोबत असलेल्या बैठकीसाठी किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, माजी आमदार जे. पी. गावित, आमदार विनोद निकोले, डॉ. अजित नवले, उमेश देशमुख, यशवंत झाडे, सदाशिव साबळे, किरण गहला, इंद्रजीत गावित, इरफान शेख, अमोल वाघमारे, अर्जुन आडे, शंकर सिडाम, अजय बुरांडे, रडका कलंगडा, उद्धव पौळ, चंदू धांगडा, नामदेव भांगरे, प्राची हातिवलेकर, लहानी दवडा, श्याम सिंग पाडवी, नंदू डहाळे, रविता पाडवी, अशोक पांडे, संगीता साळवे, हेमलता शेळके, सचिन ताजणे, संतोष मुंडे, एकनाथ मेंगाळ यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ सह्याद्री अतिथीगृहावर दाखल होणार आहे.
दरम्यान, एका बाजूला शिष्टमंडळ सरकारशी चर्चा करेल, तर दुसऱ्या बाजूला हजारो शेतकऱ्यांचा 'वाहन लाँग मार्च' मुंबईच्या दिशेने पुढे कूच करत राहणार असल्याने, आज सायंकाळी होणाऱ्या या बैठकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.