राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत ‘प्रवरा पब्लिक स्कूल’ उपविजेती!
◻️ उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर मोहित चौधरी व रोशन पवार यांची महाराष्ट्र संघात निवड
संगमनेर LIVE (लोणी) | क्रीडा व युवक सेवा संचालनालय (महाराष्ट्र राज्य, पुणे) आणि जिल्हा क्रीडा परिषद, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर येथील पोलो मैदानावर आयोजित राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत प्रवरा पब्लिक स्कूलच्या १४ वर्षांखालील मुलांच्या संघाने उल्लेखनीय यश मिळवत उपविजेतेपद पटकावले. याच स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाच्या जोरावर शाळेचे खेळाडू मोहित चौधरी आणि रोशन पवार यांची आगामी राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. बी. बी. अंबाडे यांनी दिली.
स्पर्धेत प्रवरा पब्लिक स्कूलच्या संघाने सुरुवातीपासूनच आक्रमक आणि कौशल्याधिष्ठित खेळाचे प्रदर्शन घडवले. पहिल्या फेरीत नागपूर विभागाचा ४-० अशा एकतर्फी फरकाने धुव्वा उडवला. त्यानंतर झालेल्या चुरशीच्या उपांत्य सामन्यात लातूर विभागाला २-० ने पराभूत करत संघाने थाटात अंतिम फेरीत धडक मारली.
अंतिम सामन्यात स्थानिक कोल्हापूर विभाग आणि प्रवरा पब्लिक स्कूल यांच्यात विजेतेपदासाठी रोमहर्षक लढत झाली. दोन्ही संघांनी उत्कृष्ट बचाव आणि आक्रमक चाली रचल्याने निर्धारित वेळेत सामना बरोबरीत सुटला. अखेर सामन्याचा निकाल लावण्यासाठी झालेल्या पेनल्टी शूटआऊटमध्ये कोल्हापूरने ४-२ अशी बाजी मारली. परिणामी, प्रवरा पब्लिक स्कूलला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
संघाकडून जयवर्धन माने-देशमुख, जतीन गायकवाड, ओमकार कामडी, मोहित चौधरी आणि रोशन पवार यांनी संपूर्ण स्पर्धेत अप्रतिम सांघिक खेळ केला.
या खेळाडूंना प्राचार्य डॉ. बी. बी. अंबाडे, क्रीडा संचालक अफजल पटेल, दीपक जाधव तसेच फुटबॉल प्रशिक्षक अतुल डे यांचे मार्गदर्शन लाभले.
दरम्यान, या नेत्रदीपक यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदामंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ यांच्यासह संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी यशस्वी खेळाडू व प्रशिक्षकांचे विशेष कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.