संगमनेरमध्ये एलसीबीकडून कत्तलीसाठी डांबून ठेवलेली १० जनावरे जप्त!
◻️ दोघांना बेड्या; ३ लाख ४० हजारांचा मुद्देमाल हस्तगत
संगमनेर LIVE | अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल तसेच त्यांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिले आहेत. या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी विशेष तपास पथकाची स्थापना केली होती.
हे पथक मंगळवारी संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांची माहिती घेत गस्त घालत असताना, कादरीनगर गल्ली क्रमांक दोनमधील मस्जिदे गौसो रजा समोरील मोकळ्या जागेत आणि म्हसोबा मंदिराजवळ काही जनावरे निर्दयपणे डांबून ठेवल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने तत्काळ पंचांसमक्ष संबंधित ठिकाणी छापा टाकला असता, त्या ठिकाणी कत्तल करण्याच्या उद्देशाने अमानुषपणे बांधून ठेवलेली १० गोवंशीय जनावरे आढळून आली. पोलिसांनी घटनास्थळावरून दोघा संशयितांना रंगेहात ताब्यात घेतले. तसेच त्यांच्या ताब्यातून सुमारे ३ लाख ४० हजार रुपये मूल्याची १० गोवंशीय जनावरे जप्त करत त्यांची सुटका केली.
या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही आरोपींविरुध्द संगमनेर शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पशुसंरक्षण सुधारित अधिनियम व प्राण्यांना निर्दयतेने वागवण्यास प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास संगमनेर शहर पोलीस करत आहेत.
दरम्यान, ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखालील पथकातील अंमलदार गणेश लोंढे, राहुल द्वारके, गणेश धोत्रे, अभिजित अरकल, योगेश कर्डीले, अमृत आढाव, विशाल तनपुरे, दीपक जाधव आणि सतीश भवर यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.