पुढील बिरोबा महाराज यात्रोत्सव नूतन सभामंडपातच साजरा होणार!

संगमनेर Live
0
पुढील बिरोबा महाराज यात्रोत्सव नूतन सभामंडपातच साजरा होणार!

◻️ आमदार अमोल खताळ​सुकेवाडी देवस्थान व ग्रामस्थांना ग्वाही 

◻️ लोहारे येथील १० लाखांच्या रस्त्याचे काम दिवाळीनंतर पूर्ण करण्याचे आश्‍वासन


​संगमनेर LIVE (अनिल शेळके) | ​संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी येथील धनगर समाजाचे श्रध्दास्थान असलेल्या बिरोबा महाराज व मोठेबाबा देवस्थानच्या परिसरात ग्रामस्थांच्या मागणीनुसार भव्य सभामंडप उभारण्यात येईल. पुढील वर्षीचा यात्रोत्सव नूतन सभागृहातच साजरा होईल, असा ठाम विश्‍वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला. तसेच तालुक्यातील लोहारे येथील मंजूर रस्त्याचे काम दिवाळीनंतर त्वरित पूर्ण केले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

​सुकेवाडी येथील बिरोबा महाराज व मोठेबाबा महाराज यांच्या वार्षिक यात्रोत्सवानिमित्त आमदार अमोल खताळ यांनी देवस्थानाला सदिच्छा भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी ग्रामस्थांनी देवस्थान परिसरात भाविकांच्या सुविधेसाठी सभामंडप उभारण्याची मागणी त्यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

​ग्रामस्थांशी संवाद साधताना आमदार खताळ म्हणाले, “सुकेवाडी येथील बिरोबा महाराज व मोठेबाबा देवस्थान हे संपूर्ण परिसराचे जागृत श्रध्दास्थान आहे. या देवस्थानावर माझी पूर्वीपासूनच नितांत श्रध्दा असून दर्शनासाठी मी नेहमी येत असतो. आता जनतेने तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी दिल्याने ग्रामस्थांची सभामंडपाची मागणी प्राधान्याने पूर्ण करणे हे माझे कर्तव्य आहे. यासाठी आवश्यक निधी व प्रशासकीय पाठपुरावा करून पुढील यात्रोत्सवापूर्वी हे काम मार्गी लावले जाईल.”

​यात्रोत्सवानिमित्त संगमनेर तालुक्यासह पंचक्रोशीतून हजारो भाविक दर्शनासाठी दाखल झाले होते. यंदा तालुक्यावर दुष्काळाचे सावट असल्याने शेतकरी बांधवांना या संकटातून सावरण्यासाठी बळ मिळावे, अशी प्रार्थनाही आमदार खताळ यांनी बिरोबा महाराजांच्या चरणी केली.

​दरम्यान, आमदार खताळ यांनी तालुक्यातील लोहारे येथील बिरोबा महाराज यात्रोत्सवालाही भेट देऊन दर्शन घेतले. तांडा सुधार योजनेअंतर्गत आमदार खताळ यांच्या विशेष पाठपुराव्यातून लोहारे येथील रस्त्यासाठी १० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. हे काम तातडीने सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली असता, येत्या दिवाळीनंतर रस्त्याचे काम वेगाने पूर्ण करून ग्रामस्थांची गैरसोय दूर केली जाईल, असा शब्द आमदार खताळ यांनी दिला.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !