‘प्रवरा पब्लिक स्कूल’ पुणे विभागात चॅम्पियन!

संगमनेर Live
0
‘प्रवरा पब्लिक स्कूल’ पुणे विभागात चॅम्पियन!

◻️१४ वर्षांखालील मुलांच्या संघाकडून पुणे शहराचा ५-४ ने धुव्वा!


संगमनेर LIVE ​ (अनिल शेळके) | क्रीडा क्षेत्रातील आपल्या दबदब्याची परंपरा कायम राखत, लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या ‘प्रवरा पब्लिक स्कूल'च्या १४ वर्षांखालील मुलांच्या फुटबॉल संघाने पुणे विभागस्तरीय स्पर्धेत दिमाखदार यश मिळवत विजेतेपदाला गवसणी घातली आहे. अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात पुणे शहराच्या बलाढ्य संघाचा ५-४ अशा गोलफरकाने पराभव करत प्रवरेच्या संघाने अजिंक्यपद पटकावले. या विजयामुळे संघाची आता थेट राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

​क्रीडा व युवक सेवा संचालनालय (पुणे), जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा कार्यालय (अहिल्यानगर) यांच्या संयुक्त विद्यमाने या विभागस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन प्रवरा पब्लिक स्कूल, प्रवरानगर येथे करण्यात आले होते. स्पर्धेत पुणे विभागातील नामांकित सात संघांनी सहभाग नोंदवला होता.

​सुरुवातीच्या फेऱ्यांपासूनच प्रवरा पब्लिक स्कूलच्या खेळाडूंनी अचूक पासिंग, वेगवान आक्रमक चाली, भक्कम बचाव आणि अप्रतिम गोलरक्षणाच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व राखले. अंतिम सामन्यात पुणे शहर संघाविरुध्द झालेली लढत अत्यंत चुरशीची ठरली. मात्र, अखेरच्या क्षणापर्यंत जिद्द, शिस्त आणि सांघिक एकजूट कायम ठेवत प्रवरेच्या खेळाडूंनी ५-४ अशा फरकाने बाजी मारली.

​या विजयात जयवर्धन माने-देशमुख, जतीन गायकवाड आणि ओमकार कांमडी यांनी उत्कृष्ट मैदानी खेळ सादर करत मोलाचे योगदान दिले.

​या संघाला शाळेचे प्राचार्य डॉ. बी. बी. अंबाडे, मुख्याध्यापिका एम. एस. जगधने, पर्यवेक्षिका एस. आर. रत्नपारखी यांच्यासह क्रीडा संचालक अफजल पटेल, क्रीडा शिक्षक दीपक जाधव आणि फुटबॉल प्रशिक्षक अतुल डे यांचे तांत्रिक व मोलाचे मार्गदर्शन लाभले.

दरम्यान, ​विभागीय अजिंक्यपद पटकावून राज्यस्तरावर झेप घेतल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदामंत्री नामदार डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हापरिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील, सहसचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालक डाॅ. प्रदिप दिघे, शिक्षण संचालिका सौ. लीलावती सरोदे, समन्वयक महेश खर्डे, क्रीडा संचालक रमेश दळे आणि डाॅ. उत्तम अनाप यांच्यासह संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विजेत्या खेळाडूंचे आणि क्रीडा मार्गदर्शकांचे विशेष अभिनंदन केले असून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !