चिंचोली मोहू प्रवरा फार्मसी कॉलेजमध्ये राष्ट्रीय फार्मसी सप्ताह उत्साहात संपन्न
◻️‘निरोगी भविष्यासाठी औषधनिर्मात्यांचे सक्षमीकरण’ संकल्पनेवर विविध उपक्रम
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | आरोग्यसेवेत औषधनिर्मात्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, समाजाच्या निरोगी भविष्यासाठी त्यांचे व्यावसायिक सक्षमीकरण ही काळाची गरज आहे, असा सूर येथे व्यक्त करण्यात आला. येथील लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या चिंचोली मोहू येथील ‘प्रवरा कॉलेज ऑफ फार्मसी’ (डी. फार्मसी व बी. फार्मसी) मध्ये 'राष्ट्रीय फार्मसी सप्ताह' आणि ‘जागतिक औषधनिर्माता दिन' विविध शैक्षणिक व सर्जनशील उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.
फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया (नवी दिल्ली) यांच्या आवाहनानुसार यंदा ‘एम्पॉवरिंग फार्मासिस्ट फॉर हेल्थियर फ्युचर’ (निरोगी भविष्यासाठी औषधनिर्मात्यांचे सक्षमीकरण) ही मध्यवर्ती संकल्पना घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यानिमित्ताने विद्यार्थ्यांमधील ज्ञान, सर्जनशीलता आणि व्यावसायिक कौशल्यांना वाव देण्यासाठी विविध राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये राज्यस्तरीय फार्मा प्रश्नमंजुषा, पोस्टर सादरीकरण, फार्मा रांगोळी तसेच आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित फार्मा रील स्पर्धांचा समावेश होता. या सर्व स्पर्धांना राज्यभरातील फार्मसी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. औषधनिर्मिती, औषधांचा सुरक्षित व योग्य वापर, आरोग्यविषयक जनजागृती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पक संकल्पना प्रभावीपणे मांडल्या. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय तांबे यांनी सांगितले की, आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात फार्मासिस्टची जबाबदारी पूर्वीपेक्षा अधिक वाढली आहे. केवळ औषधांचे वितरण करणे एवढ्यापुरतेच त्यांचे कार्य मर्यादित नसून, रुग्णांना औषधांचा सुरक्षित वापर समजावणे आणि त्यांचे योग्य समुपदेशन करणे ही त्यांची नैतिक व सामाजिक जबाबदारी आहे.
दरम्यान, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. तसेच, कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यानी विशेष परिश्रम घेतले.