अहिल्यानगरमध्ये उद्या ‘विकसित भारत संकल्प सभा’ व ‘सेवा ज्योती यात्रा’
◻️पंतप्रधान मोदी दूरदृश्य प्रणालीद्वारे साधणार थेट संवाद
संगमनेर LIVE (अहिल्यानगर) | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातचे मुख्यमंत्री ते देशाचे पंतप्रधान या ऐतिहासिक राजकीय आणि सामाजिक कारकिर्दीला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या गौरवशाली वाटचालीनिमित्त अहिल्यानगर जिल्हा व शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने बुधवार, ७ ऑक्टोबर रोजी भव्य ‘विकसित भारत संकल्प सभा’ आणि ‘सेवा ज्योती यात्रे'चे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजता आनंदधामसमोरील केशर गुलाब मंगल कार्यालयात हा सोहळा संपन्न होणार आहे, अशी माहिती शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते व उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांनी दिली.
कार्यक्रमात सकाळी ९ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हर्च्युअल) उपस्थित राहून ‘विकसित भारत संकल्प सभे'ला संबोधित करणार आहेत. या माध्यमातून ते जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांशी थेट संवाद साधून मार्गदर्शन करतील. पंतप्रधान पदाच्या सेवेचा रौप्यमहोत्सवी टप्पा साजरा करताना कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
संकल्प सभेनंतर शहरात भव्य ‘सेवा ज्योती यात्रा’ काढण्यात येणार आहे. या यात्रेची सुरुवात केशर गुलाब मंगल कार्यालयापासून होईल. मार्गावरील शहरातील विविध महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले जाईल. त्यानंतर अहिल्यानगरचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरात भव्य महाआरती करून यात्रेचा भक्तिभावाने समारोप होईल.
या ऐतिहासिक सोहळ्यासाठी विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, आमदार मोनिका राजळे, आमदार विक्रमसिंह पाचपुते, आमदार अक्षय कर्डिले, आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार विवेक कोल्हे, जिल्हा प्रभारी माजी आमदार राम सातपुते, लक्ष्मण सावजी तसेच भैरवी वाघ-पलांडे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधी व वरिष्ठ पदाधिकारी प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, पंतप्रधानांच्या २५ वर्षांच्या राष्ट्रसेवेचा गौरव करणाऱ्या या उपक्रमास जिल्ह्यातील सर्व आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, विविध आघाड्यांचे कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजप दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर आणि शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांनी केले आहे.