दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे मासिक एस.टी. पास शुल्क माफ करा!

संगमनेर Live
0
दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे मासिक एस.टी. पास शुल्क माफ करा!

◻️​आमदार अमोल खताळ यांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी


​संगमनेर LIVE (अनिल शेळके) | ग्रामीण भागातील दुष्काळाच्या तीव्र संकटाच्या पार्श्‍वभूमीवर शेतकरी व कष्टकरी कुटुंबांना मोठा दिलासा देण्यासाठी दुष्काळग्रस्त भागातील शालेय, कनिष्ठ महाविद्यालयीन तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे मासिक एस.टी. बस पास शुल्क शंभर टक्के माफ करण्यात यावे, अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी केली आहे. यासंदर्भात आमदार खताळ यांनी मुंबई येथे राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन दिले.

​प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात आमदार अमोल खताळ यांनी नमूद केले की, ग्रामीण भागातील गावांमध्ये उच्च शिक्षणाच्या पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना तालुका, शहर अथवा जिल्ह्याच्या ठिकाणी दररोज प्रवास करावा लागतो. अशा विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित, नियमित आणि परवडणारी राज्य परिवहन महामंडळाची (एस.टी.) बस हीच जीवनवाहिनी आहे.

​सध्याच्या दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील कुटुंबांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. अशा प्रतिकूल स्थितीत विद्यार्थ्यांच्या प्रवासाचा खर्च पालकांसाठी मोठे आव्हान ठरत असून, आर्थिक विवंचनेमुळे एकाही विद्यार्थ्याचे शिक्षण अर्धवट सुटू नये यासाठी शासनाने विद्यार्थ्यांच्या मासिक बस पासचे शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा तातडीने शासन निर्णय (जीआर) जारी करावा. तसेच या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित विभागीय नियंत्रक व आगार व्यवस्थापकांना स्पष्ट निर्देश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.

​संगमनेर तालुक्यातील प्रवाशांच्या सोयीसाठी आगारात अत्याधुनिक इलेक्ट्रिक बसेस सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी मागील आठवड्यात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली होती. या मागणीची तातडीने दखल घेत परिवहन मंत्र्यांनी संगमनेर आगारासाठी २५ वातानुकूलित इलेक्ट्रिक ‘शिवाई’ बसेस मंजूर केल्या आहेत. ​यातील पहिल्या टप्प्यातील १० इलेक्ट्रिक बसेस येत्या गुरुवारी संगमनेर आगारात दाखल होणार असून, उर्वरित बसेस लवकरच सेवेत रुजू होतील, अशी माहिती आमदार खताळ यांनी संगमनेर लाईव्हला दिली.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !