प्रवरेच्या विद्यार्थ्यांचा राज्यस्तरीय तंत्रज्ञान प्रश्नमंजुषेत डंका!
◻️ तांत्रिक बुध्दिमत्तेच्या जोरावर पटकावले १५ हजारांचे प्रथम पारितोषिक
संगमनेर LIVE (लोणी) | तांत्रिक ज्ञान, विश्लेषण क्षमता आणि प्रसंगावधानाचा कस पाहणाऱ्या राज्यस्तरीय तंत्रज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेत यजमान पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील पॉलिटेक्निकच्या (लोणी) विद्यार्थ्यांनी सर्वोत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांकाचा बहुमान पटकावला. शुभम बाळासाहेब नरोडे आणि यशराज समीर गुमास्ते या जोडीने १५ हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक पटकावून संस्थेच्या यशाची परंपरा कायम राखली.
लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड इंजिनिअरिंग (पॉलिटेक्निक) लोणी येथे महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ (एमएसबीटीई), मुंबई यांच्या प्रायोजकत्वाखाली ५ ऑक्टोबर रोजी ही स्पर्धा पार पडली. यांत्रिकी अभियांत्रिकी शाखेतील पदविका विद्यार्थ्यांसाठी आयोजित या स्पर्धेत राज्यभरातील विविध तंत्रनिकेतनांतील संघांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता.
स्पर्धेमध्ये संदीप पॉलिटेक्निक (नाशिक) येथील शाहिद अन्सारी आणि मंथन संदीप दळवी यांनी द्वितीय क्रमांक पटकावत १० हजार रुपयांचे पारितोषिक मिळविले. तर एस.एच.एच.जे.बी. पॉलिटेक्निक कॉलेज (चांदवड) येथील रोहित संदीप मोरे आणि अध्ययन रवींद्र चव्हाण यांनी तृतीय क्रमांक मिळवून पाच हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले. सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिके व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेत अभ्यासक्रमातील मूलभूत संकल्पनांसह आधुनिक व अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित विविध फेऱ्या घेण्यात आल्या. याद्वारे विद्यार्थ्यांची तर्कशुध्द विचारशक्ती, निर्णयक्षमता आणि प्रसंगावधानाची कसून चाचणी घेण्यात आली. राज्यस्तरावर आपले कौशल्य सिद्ध करण्यासाठी विद्यार्थ्यांना या माध्यमातून हक्काचे व्यासपीठ लाभले.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी यांत्रिकी अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. आर. के. बेलकर, समन्वयक प्रा. व्ही. आर. लवांडे, सहसमन्वयक प्रा. एस. डी. शेळके तसेच समितीतील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
दरम्यान, विजेत्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ आणि प्राचार्य डॉ. व्ही. आर. राठी यांनी अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.