संगमनेरचा दुष्काळी भाग सुजलाम्-सुफलाम् करणार - आमदार अमोल खताळ
◻️ सातबारा शेतकऱ्यांचा पण मालकी दुसऱ्यांचीच, अशी जहागीरदारी जनतेने मोडून काढली
◻️ पिंपळे येथे शिवसेना शाखेचे उध्दघाटन संपन्न
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | संगमनेर तालुका म्हणजे काही जणांची जहागीरदारीच झाली होती. सातबारा उतारा शेतकऱ्यांच्या नावावर असला तरी प्रत्यक्ष मालकी मात्र दुसऱ्यांचीच, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, तालुक्यातील जनतेने परिवर्तनाचा कौल देत मला काम करण्याची संधी दिली आहे,” अशा शब्दांत आमदार अमोल खताळ यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.
संगमनेर तालुक्यातील पिंपळे येथे शिवसेना शाखेचे उध्दघाटन आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. त्यावेळी आयोजित जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमात बोलताना आमदार खताळ म्हणाले, “माझ्यासाठी आमदारकी ही प्रतिष्ठा मिरविण्याचे साधन नसून जनतेची सेवा करण्याची जबाबदारी आहे. मला कुटुंबातील कोणाला ठेकेदार बनवायचे नाही किंवा घराणेशाही चालवायची नाही; जनतेचा विश्वास हीच माझी संपत्ती आहे. घरकुलांच्या जागेचा प्रश्न आगामी हिवाळी अधिवेशनात मांडून तो मार्गी लावणार आहे. मी सत्ताधारी पक्षाचा आमदार असलो, तरी जनतेच्या न्याय्य हक्कासाठी गरज पडल्यास आंदोलन करण्यासही मागेपुढे पाहणार नाही.” असे त्यांनी स्पष्ट केले.
निमोण आणि तळेगाव परिसराच्या पाणीप्रश्नावर बोलताना ते म्हणाले, “हा भाग कायम दुष्काळी म्हणून हिणवून काहींनी दोन-तीन पिढ्यांचे नुकसान केले. मात्र, भोजापूर पाझर तलावाचा पाण्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावून हा दुष्काळी भाग सुजलाम्-सुफलाम् केल्याशिवाय आपण शांत बसणार नाही.” अशी ग्वाही त्यांनी दिली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आमदार खताळ यांनी पुष्पगुच्छ व वैयक्तिक सत्काराला फाटा देत सामाजिक बांधिलकी जपली. पिंपळे शाखेच्या वतीने गरीब कुटुंबांना दिवाळी शिधावाटप करण्यात आले. तसेच अपघातात आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या युवराज व पूनम माळी या बालकांना नवीन पोशाख, तर ताराबाई माळी यांना साडी देऊन आधार देण्यात आला.
याप्रसंगी नामदेव चकोर, विठ्ठल घोरपडे, राजेंद्र सोनवणे, डॉ. संतोष डांगे, हरिश्चंद्र चकोर, गणेश सानप, सौरभ देशमुख, सुशील शेवाळे, अमोल आंधळे, अमोल चकोर, आकाश चकोर, सुधीर घुगे, कासिम मुजावर, सार्थक शेवाळे, संकेत राठी, हरिभाऊ ढोणे, बाळासाहेब चकोर, रविराज चकोर, अंकुश चकोर, लहानु कळस्कर, रघुनाथ कोटकर, मच्छिंद्र कोटकर, विठ्ठल कोटकर, अर्जुन कोटकर, विराज चकोर, खंडू वाघ यांच्यासह शिवसैनिक आणि ग्रामस्थं मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंकुश चकोर यांनी केले. सूत्रसंचालन प्रशांत कर्पे यांनी केले, तर आभार प्रदर्शन खंडू वाघ यांनी मानले.