संगमनेरमधील दादागिरी व दहशतीचे दिवस आता संपले - आमदार अमोल खताळ

संगमनेर Live
0

संगमनेरमधील दादागिरी व दहशतीचे दिवस आता संपले - आमदार अमोल खताळ

◻️ शहरातील ​साईनगर येथे पहिल्या महिला शिवसेना शाखेचे उध्दघाटन 

◻️शासकीय कामांसाठी दिवाळीनंतर विशेष शिबिर




​संगमनेर LIVE (अनिल शेळक) | “नगरपालिका निवडणुकीतील जय-पराजय बाजूला ठेवून जनतेच्या प्रश्नांसाठी आणि संगमनेर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमचा संघर्ष अविरत सुरूच राहील. नगरपालिकेची सत्ता हातात नसली, तरी राज्य शासनाच्या माध्यमातून निधी आणून शहरातील समस्या प्राधान्याने सोडवल्या जातील,”अशी ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी दिली. संगमनेरमधील दादागिरी आणि दहशतीचे दिवस आता संपले असून सर्वसामान्यांच्या हक्कासाठी शिवसेना सदैव पाठीशी उभी राहील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

शहरातील ​साईनगर येथे शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आणि नगरसेविका साक्षी सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या तालुक्यातील पहिल्या महिला शिवसेना शाखेच्या उध्दघाटनप्रसंगी ते बोलत होते. या शाखेचे उध्दघाटन आमदार अमोल खताळ आणि आदिशक्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. नीलम खताळ यांच्या हस्ते संपन्न झाले.

​आमदार खताळ यांनी परिसरातील नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष वेधताना सांगितले की, “साईनगर आणि मालदाड रोड परिसरातील नागरिकांच्या घरांवरील आरक्षणाचा गुंता लवकरच सोडवून सातबारा उतारे थेट नागरिकांच्या नावे करण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा सुरू आहे. यासोबतच महिलांना रोजगाराच्या नव्या संधी, बचत गटांचे बळकटीकरण आणि विविध कल्याणकारी शासकीय योजनांचा थेट लाभ मिळवून देण्यासाठी विशेष प्राधान्य दिले जाईल.”

​निवडणुकीविषयी बोलताना ते म्हणाले की, “ही लढत 'धनशक्ती विरुध्द जनशक्ती' अशी झाली. जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य असून जय-पराजयापेक्षा जनतेचा विश्वास आमच्यासाठी अधिक मोलाचा आहे.”

​“यापूर्वी सर्वसामान्यांना रेशनकार्ड, आधारकार्ड यांसारख्या साध्या शासकीय कामांसाठीही मध्यस्थांची मदत घ्यावी लागत होती. मात्र, तालुक्यात बदल झाल्यानंतर संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून ही कामे थेट केली जात आहेत. साईनगर परिसरात दिवाळीनंतर एक विशेष शिबिर आयोजित केले जाईल. यामध्ये संजय गांधी निराधार योजना, आधार दुरुस्ती, नवीन रेशनकार्ड व इतर योजनांचे अर्ज जागेवरच निकाली काढले जातील.” असे आश्‍वासन आमदार अमोल खताळ यांनी दिले.

याआधी प्रास्ताविकातून शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी यांनी पहिली महिला शाखा सुरू करण्यामागील भूमिका स्पष्ट केली. तर, नगरसेविका साक्षी सूर्यवंशी यांनी, “महिलांचे संघटन करून त्यांच्या अडीअडचणी प्रशासनापर्यंत पोहोचवणे आणि शासकीय योजना घराघरांत पोहोचवणे हेच या शाखेचे उद्दिष्ट राहील,” असे सांगितले.

दरम्यान, या कार्यक्रमावेळी नगरसेविका साक्षी सूर्यवंशी, अल्पना तांबे, सुमन शेलकर, दगाबाई धात्रक, मंदा ठोंबरे, शिवानी आरगडे, अंजली बेल्हेकर, स्वाती पवार, भावना गुंजाळ, गीता माकरे यांच्यासह शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी, बाबा शेलकर, सागर भोईर, सनी धारणकर, समीर ओझा, सपना जाधव, संगीता पुंड, पुनम दायमा आदीसह प्रमुख पदाधिकारी, शिवसैनिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !