गिऱ्हेवाडीत अवैध दारू अड्ड्यावर आमदार अमोल खताळ यांची कारवाई

संगमनेर Live
0
गिऱ्हेवाडीत अवैध दारू अड्ड्यावर आमदार अमोल खताळ यांची कारवाई

◻️ आमदारांची ‘ऑन द स्पॉट’ कारवाई; जनावरांच्या चाऱ्यातून जप्त केली दारू

◻️ दिवाळी शिधा वाटप कार्यक्रमात महिलांनी मांडली होती व्यथा


​संगमनेर LIVE | “आमच्या वाडी-वस्तीवर अनधिकृत देशी दारूची सर्रास विक्री सुरू आहे. घरातील कर्ते पुरुष आणि तरुण मुले दारूच्या आहारी गेल्याने आमचे सुखी संसार उघड्यावर आले आहेत. कष्टाची कमाई दारूत उधळली जात असल्याने मुलाबाळांच्या पोटाला चिमटा बसत आहे. साहेब, तुम्ही आम्हाला दिवाळीचा आनंदाचा शिधा दिला, पण अशा उद्ध्वस्त परिस्थितीत हा शिधा आम्ही खायचा तरी कसा?” अशा शब्दांत हिवरगाव पठार परिसरातील महिलांनी आमदार अमोल खताळ यांच्यासमोर हंबरडा फोडला. या आर्त हाकेला क्षणाचाही विलंब न लावता आमदार खताळ यांनी तातडीने पोलिसांसह घटनास्थळी धाव घेत जनावरांच्या चाऱ्यात लपवलेला दारूचा साठा जप्त केला.

​उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या ‘दिवाळी शिधा’ वाटपाचा कार्यक्रम हिवरगाव पठार ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गिऱ्हेवाडी, पायरवाडी आणि सुतारवाडी या आदिवासी वाड्यांमध्ये आयोजित करण्यात आला होता. आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते गरिबांना हा शिधा वाटप केला जात असतानाच, स्थानिक महिलांनी आक्रमक होत परिसरातील अवैध दारूविक्रीचा गंभीर प्रश्न मांडला.

​साकूर पठार भागातील विविध वाडी-वस्त्यांवर राजरोसपणे सुरू असलेल्या दारूच्या विक्रीमुळे कुटुंबांची वाताहत झाली आहे. घरातील पुरुष व्यसनाधीन झाल्याने मुलांचे शिक्षण, संगोपन आणि प्रपंचाचा संपूर्ण गाडा महिलांनाच ओढावा लागत आहे. कष्टाचा पैसा दारूवर वाया जात असल्याने उपासमारीची वेळ आल्याचे सांगत, “हा संसार उद्ध्वस्त करणारा धंदा कायमचा बंद करा,” अशी मागणी महिलांनी केली.

महिलांच्या डोळ्यांतील अश्रू आणि व्यथेचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार खताळ यांनी कार्यक्रम संपताच घारगाव पोलिसांना पाचारण केले. केवळ सूचना देऊन न थांबता, तक्रारदार महिला आणि पोलिसांना सोबत घेऊन आमदार स्वतः संबंधित अड्ड्यावर पोहोचले. पोलिसांनी केलेल्या झाडाझडतीत जनावरांच्या कडबा-चाऱ्याखाली लपवून ठेवलेला देशी दारूचा मोठा साठा हस्तगत करण्यात आला.

या कारवाईदरम्यान दारूविक्रेत्या महिलेने आमदार खताळ यांच्यासमोर “आम्हाला साकूर येथील शंकर खेमनर यांना नियमित हप्ता द्यावा लागतो,” असा उघड दावा केला. या खुलाशाने परिसरात मोठी चर्चा रंगली आहे.

दरम्यान, ​महिलांच्या तक्रारीवर कोणतीही टोलवाटोलवी न करता तत्काळ जागेवर जाऊन धडक कारवाई केल्याबद्दल गिऱ्हेवाडी, पायरवाडी व सुतारवाडी परिसरातील महिलांनी समाधान व्यक्त केले असून आमदार अमोल खताळ यांचे आभार मानले आहेत.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !