जोर्वे गावात विखे-थोरात समर्थकांमध्ये झेंडा लावण्यावरून तुफान राडा

संगमनेर Live
0
जोर्वे गावात विखे-थोरात समर्थकांमध्ये झेंडा लावण्यावरून तुफान राडा

◻️ दोन्ही बाजूकडील तब्बल ४२ जणांवर गुन्हे दाखल


​संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील जोर्वे गावात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या समर्थकांमध्ये जोरदार राडा झाल्याची खळबळजनक घटना रविवारी सकाळी घडली. मुख्य चौकात लोखंडी पोल (झेंडा) उभारण्याच्या कारणावरून हा वाद पेटला असून, पोलिसांनी प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी माजी मंत्री थोरातांचे बंधू इंद्रजीत थोरात आणि शरद थोरात, तसेच विखे समर्थक व माजी उपसरपंच गोकुळ दिघे यांच्यासह दोन्ही बाजूंच्या तब्बल ४२ जणांवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार, दि. १ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास जोर्वे गावातील मुख्य चौकात एका लोखंडी पोल लावण्यावरून दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते आमनेसामने आले. पोलीस प्रशासनाने यापूर्वीच गावात स्पष्ट सूचना व प्रतिबंधात्मक आदेश जारी केले होते; मात्र त्याकडे दुर्लक्ष करत कार्यकर्त्यांनी बेकायदेशीर जमाव जमवला. वादाचे रूपांतर काही क्षणांतच जोरदार बाचाबाची आणि हाणामारीत झाले. 

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता काशिनाथ गुंजाळ, कनिष्ठ अभियंता राहुल गुंजाळ यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन करत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर झेंडा आणि पोल काढून टाकण्यात आला. तसेच या ठिकाणी कोणत्याही गटाला अथवा व्यक्तीला झेंडा किंवा पोल उभारता येणार नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.

​दरम्यान, अहिल्यानगर जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू असतानाही त्याचे उल्लंघन करण्यात आल्याने पोलिसांनी या प्रकरणी कठोर भूमिका घेतली आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल अमित महाजन यांच्या फिर्यादीवरून संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) विविध कलमांसह महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

दरम्यान यावेळी पोलीसांनी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे बंधू इंद्रजीत थोरात, सुरेश थोरात, शरद थोरात, संजय थोरात, राजेंद्र थोरात, वसंत बोरकर, अक्षय दिघे, रमेश दिघे, मुकेश काकड, सत्यजित थोरात, हर्षल काकड, विठ्ठल काकड, भाऊसाहेब दिघे, अभिषेक थोरात, बादशाह बोरकर, अमित थोरात, पुंजा दिघे, कैलास इंगळे, किसन खैरे, दिगंबर इंगळे, राहुल बोरकर, अनिल दिघे यांच्यावर गुन्हा दाखल केला.

तसेच मंत्री विखे पाटील समर्थक गोकुळ दिघे, नितीन दिघे, विशाल थोरात, वसंत दिघे, शरद दिघे, बाळासाहेब जोर्वेकर, अनिकेत जोर्वेकर, मयूर गाडेकर, बाबासाहेब थोरात, रवींद्र गाडेकर, बाळासाहेब दिघे, दिलीप काकड, प्रकाश काकड, गणेश काकड, नंदू थोरात, बाळासाहेब इंगळे, मच्छिंद्र पिंपळे, जितेंद्र दिघे, नवनाथ बलसाने, पंढरीनाथ बलसाने अशा दोन्ही गटातील एकूण ४२ जणांवर गुन्हा केला आहे. तर, या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक काळे करत आहेत.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !