औरंगपूर येथे हायड्रोपोनिक व युरिया प्रक्रिया तंत्रज्ञान शिबिर
◻️दुष्काळावर मात करण्यासाठी अवघ्या आठ दिवसांत पिकवा पौष्टिक हिरवा चारा!
◻️मातीविना अवघ्या ८ दिवसांत दर्जेदार चारा निर्मिती
संगमनेर LIVE | सध्याची भीषण दुष्काळी परिस्थिती आणि चाऱ्याची तीव्र टंचाई लक्षात घेता, दुग्धव्यवसायिकांचा उत्पादन खर्च कमी करून जनावरांना पौष्टिक हिरवा चारा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र, बाभळेश्वर (पायरेन्स) पुढे सरसावले आहे. ‘खेत बचाओ अभियान’ अंतर्गत औरंगपूर येथे दुग्धव्यवसायिकांसाठी एकदिवसीय तंत्रज्ञान प्रशिक्षण शिबिर उत्साहात पार पडले. यामध्ये हायड्रोपोनिक पध्दतीने मका चारा निर्मिती आणि गव्हाच्या भुशावर युरिया प्रक्रिया करण्याचे प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात आले.
या शिबिराला परिसरातील शेतकरी व दुग्धव्यवसायिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. जलसंपदा मंत्री तथा संस्थेचे अध्यक्ष नामदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुप्रिया ढोकणे, संचालक डॉ. उत्तम कदम, पायरेन्सचे सचिव डॉ. निलेश बनकर व प्रमुख शास्त्रज्ञ शैलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला.
प्रशिक्षणामध्ये केव्हीकेच्या पशुसंवर्धन विभागाचे डॉ. विठ्ठल विखे यांनी हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती दिली. मातीचा वापर न करता अत्यंत कमी जागेत आणि अल्प पाण्यात मक्यापासून अवघ्या सात ते आठ दिवसांत दर्जेदार हिरवा चारा तयार करता येतो. यासाठी चांगल्या प्रतीचे मका बियाणे निवडून सुमारे १२ तास पाण्यात भिजवून ठेवावे. त्यानंतर ते ओल्या गोणपाटात बांधून मोड आणावेत. हे मोड आलेले बियाणे प्लास्टिकच्या ट्रेमध्ये पसरून रॅकवर ठेवावे आणि फॉगर किंवा तुषार सिंचनाद्वारे नियमित हलके पाणी द्यावे. या पद्धतीमुळे अवघ्या आठ दिवसांत साधारण २५ ते ३० सेंटीमीटर उंचीचा मुळांसह हिरवा चारा तयार होतो, जो सुक्या चाऱ्यात मिसळून जनावरांना देता येतो.
दरम्यान, निकृष्ट दर्जाच्या कोरड्या गव्हाच्या भुशाची पचनक्षमता व रुचकरपणा वाढवण्यासाठी त्यावर युरिया आणि गुळाची प्रक्रिया करण्याचे प्रात्यक्षिकही यावेळी दाखवण्यात आले. या प्रक्रियेमुळे जनावरे कोरडा चारा अधिक आवडीने खातात. परिणामी दुष्काळात जनावरांचे कुपोषण टळून पशुखाद्यावरील अतिरिक्त खर्चात मोठी बचत होते. असे स्पष्ट करण्यात आले.
डॉ. विठ्ठल विखे म्हणाले, “दुष्काळात चारा टंचाई ही मोठी समस्या असली तरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी स्वावलंबी होऊ शकतात. कमी पाण्यात आणि मर्यादित खर्चात दर्जेदार चारा मिळवण्यासाठी हायड्रोपोनिक व युरिया प्रक्रिया तंत्रज्ञान वरदान ठरेल.”
“पालकमंत्री विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, केव्हीके बाभळेश्वर आणि प्रवरा कृषी शास्त्र संस्थेच्या वतीने दुष्काळात शेतकऱ्यांना पाणी, चारा, फळबाग व पीक व्यवस्थापनाचे सातत्याने मार्गदर्शन केले जाणार आहे. शेतकऱ्यांनी दुष्काळाला घाबरून न जाता उपलब्ध तंत्रज्ञानाचा अवलंब करून संकटावर मात करावी,” असे आवाहन डॉ. उत्तम कदम यांनी केले आहे.