अहिल्यानगर जिल्हा बॅकेवर ‘सहकार विकास आघाडी’ची एकहाती सत्ता!

संगमनेर Live
0
अहिल्यानगर जिल्हा बॅकेवर ‘सहकार विकास आघाडी’ची एकहाती सत्ता!

◻️​ विखे-थोरात एकजुटीवर सभासदांचा विश्‍वास; १७ जागांवर ऐतिहासिक विजय!


संगमनेर LIVE (अहिल्यानगर) | अहिल्यानगर जिल्ह्याच्या सहकार आणि राजकीय पटलावर अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेच्या (एडीसीसी) संचालक मंडळाच्या निवडणुकीत ‘सहकार विकास आघाडी'ने १८ पैकी १७ जागांवर दणदणीत विजय मिळवत आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. 

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि काॅग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या ऐतिहासिक राजकीय एकजुटीवर जिल्ह्यातील शेतकरी, सहकारी संस्थांचे प्रतिनिधी आणि बॅकेच्या सभासदांनी मताधिक्यांची भक्कम मोहोर उमटवली आहे. या निवडणुकीत आघाडीने सुरुवातीपासूनच एकतर्फी वर्चस्व राखत विरोधकांचे आव्हान अक्षरशः मोडीत काढले.

​निवडणूक प्रक्रियेदरम्यान सहकार विकास आघाडीच्या भक्कम संघटनशक्ती आणि नेत्यांमधील समन्वयामुळे मतदानापूर्वीच तब्बल १० जागा बिनविरोध निश्चित झाल्या होत्या. यामध्ये संगमनेरमधून रणजीतसिंह देशमुख, नेवासा येथून शंकरराव गडाख, राहाता येथून डॉ. सुजय विखे पाटील, श्रीरामपूरमधून करण ससाणे, पाथर्डीतून आमदार मोनिका राजळे, शेवगावमधून राजश्री घुले पाटील, श्रीगोंद्यातून दत्तात्रय पानसरे, कोपरगावमधून बिपिन कोल्हे, नगर तालुक्यातून अक्षय कर्डिले आणि बिगरशेती मतदारसंघातून सचिन जगताप यांची बिनविरोध निवड झाली. या बिनविरोध जागांमुळे मतदानाआधीच आघाडीचे पारडे जड झाले होते.

​बिनविरोध जागांनंतर उर्वरित जागांसाठी झालेल्या प्रत्यक्ष मतमोजणीतही सहकार विकास आघाडीच्या उमेदवारांनी आपले निर्विवाद वर्चस्व कायम राखले. प्रत्यक्ष लढतीमध्ये आशुतोष अशोकराव काळे, अनुराधाताई राजेंद्र नागवडे, संगीता जयंत वाघ, वैभव मधुकर पिचड, करभारी झुंबर जवळे, गणपतराव पुंजाजी सांगळे आणि प्राजक्त प्रसाद तनपुरे यांनी प्रतिस्पर्ध्यांना मोठ्या फरकाने पराभूत करत दणदणीत विजय संपादन केला. कृषी, बिगरशेती, अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्गीय (ओबीसी) तसेच महिला राखीव मतदारसंघांमध्ये आघाडीच्या उमेदवारांना सभासदांचा एकतर्फी व भक्कम पाठिंबा मिळाला.

जिल्ह्याच्या राजकारणात परस्परांचे पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी मानले जाणारे विखे आणि थोरात हे सहकार चळवळीच्या हितासाठी एकाच मंचावर आले. त्यांच्यासोबत माजी मंत्री शंकरराव गडाख आणि चंद्रशेखर घुले यांनी तालुकानिहाय केलेली व्यूहरचना, कार्यकर्त्यांची भक्कम फळी आणि थेट सभासदांपर्यंत पोहोचलेली यंत्रणा यामुळेच हा ऐतिहासिक विजय साकार झाला. १८ पैकी १७ जागांवर मिळविलेल्या या निर्विवाद यशामुळे विखे-थोरात एकजुटीची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून, या निकालाचे दूरगामी पडसाद आगामी राजकीय समीकरणांवरही उमटणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

दरम्यान, ​या विजयानंतर सहकार विकास आघाडीतर्फे जिल्ह्यातील सर्व शेतकरी, मतदार आणि कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. जिल्हा बॅक हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आणि बळीराजाचा मुख्य कणा असल्याने मतदारांनी दाखवलेला हा विश्‍वास सार्थ ठरवला जाईल, अशी ग्वाही आघाडीच्या प्रमुख नेतृत्वाने दिली. तसेच जिल्ह्यातील सहकार चळवळ अधिक पारदर्शक, सक्षम आणि शेतकरीकेंद्रित करून ग्रामीण भागाच्या विकासाला नवी गती देण्याचा निर्धारही याप्रसंगी व्यक्त करण्यात आला.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !