शिवसेनेच्या वतीने ‘शेतकरी सेवा केंद्र’ सुरू करणार - आमदार अमोल खताळ
◻️‘जलजीवन’च्या कामांची पोलखोलसह दुष्काळी उपाययोजनाची पत्रकार परिषदेत माहिती
◻️निकृष्ट संगमनेर-अकोले रस्त्याची दुरुस्ती ठेकेदाराकडूनच करून घेणार
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | संगमनेर तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेच्या कामांवर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होऊनही अनेक योजना अद्याप अपूर्ण आहेत. यामुळे जनतेला पाण्यासाठी वणवण करावी लागत असून याचा फायदा केवळ ठेकेदारांनाच झाला आहे. त्यामुळे या योजनेअंतर्गत काम करणाऱ्या पहिल्या दहा ठेकेदारांची कुंडली समाजमाध्यमांद्वारे थेट जनतेसमोर आणणार असल्याचा इशारा आमदार अमोल खताळ यांनी दिला. तसेच संगमनेरच्या दुष्काळी भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी शिवसेनेच्या वतीने स्वखर्चाने टॅकर सुरू करण्यात येणार असून एकाही नागरिकाला वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
शहरातील शिवसेना महायुती जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत आमदार खताळ बोलत होते. यावेळी त्यांनी तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती, विकासकामे आणि प्रशासकीय उपाययोजनांचा सविस्तर आढावा मांडला.
आमदार अमोल खताळ म्हणाले की, दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांची दिवाळी गोड व्हावी म्हणून शिवसेनेच्या वतीने दिवाळी किटचे वाटप सुरू करण्यात आले आहे. शासकीय टॅकरव्यतिरिक्त आवश्यकतेनुसार स्वखर्चाने पाण्याचे टॅकर उपलब्ध केले जातील. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होऊ नये म्हणून रब्बी हंगामात चारा पिकांच्या लागवडीला प्रोत्साहन दिले जाईल, तसेच गरज पडल्यास चारा छावण्या सुरू करण्यात येतील. शेतकरी व मजुरांच्या हाताला काम मिळण्यासाठी रोजगार हमी योजनेची (रोहयो) कामे सुरू केली जात असून, शेतकऱ्यांना थेट मदत व मार्गदर्शन मिळण्यासाठी स्वतंत्र ‘शेतकरी सेवा केंद्र’ सुरू करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
दुष्काळात पाणीपुरवठा योजनांची वीजजोडणी खंडित करू नये, अशा स्पष्ट सूचना महावितरण कंपनीला दिल्या आहेत. पुढील पावसाळ्यात भूजल पातळी वाढावी यासाठी आतापासूनच जलसंधारणाची कामे हाती घेतली जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
नुकत्याच झालेल्या संगमनेर-अकोले रस्त्यावर अल्पावधीतच खड्डे पडल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. या कामाच्या निकृष्ट दर्जाची संपूर्ण जबाबदारी संबंधित ठेकेदाराची असून, त्याच्याकडूनच हा रस्ता पुन्हा दुरुस्त करून घेतला जाईल. तालुक्यातील इतर प्रलंबित रस्त्यांची कामेही प्राधान्याने मार्गी लावली जातील, असेही आमदार खताळ यांनी यावेळी स्पष्ट केले.
‘सरकार पडणार’ या माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या विधानाचा समाचार घेताना आमदार खताळ म्हणाले, “सध्याच्या राजकीय परिस्थितीतून आलेल्या निराशेपोटीच थोरातांनी हे वक्तव्य केले असावे. हे त्यांचे वैफल्य दर्शवणारे विधान आहे. सरकार पाडण्याच्या वल्गना करण्यापेक्षा त्यांनी जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष द्यावे.” असा टोला लगावला.