◻चार बोकड व तीन शेळ्याचा समावेश ; १ लाखाचे नुकसान.
संगमनेर Live | तालुक्यातील आश्वी खुर्द शिवारातील पिप्रीं फाट्यालगत प्रा. कान्हु गिते यांच्या वस्तीवर सोमवारी मध्यरात्री बिबट्याने हल्ला करुन सात शेळ्या ठार केल्याची घटना घडली असून यामध्ये चार बोकड व तीन शेळ्याचा समावेश असल्याने अदांजे गिते यांचे १ लाख रुपये नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.
आश्वी खुर्द शिवारातील पिप्रीं फाट्यालगत गट नंबर १३३ मध्ये प्रा. कान्हु गिते यांची वस्ती व शेळ्याचा गोठा आहे. सोमवारी रात्री पाऊस व वारा सुटल्यामुळे गिते यानी शेळ्याच्या गोठ्यात जाऊन पाहणी केली त्यावेळी सर्वकाही ठिक होते. परंतू मध्यरात्री २.३० वाजेच्या सुमारास शेळ्याचा ओरडण्याचा आवाज आल्याने गिते यानी गोठ्याकडे धाव घेतली असता चार बोकड व तीन शेळ्या या मृतावस्थेत आढळून आल्या. गिते यांचा शेळ्याचा गोठा हा लोखंडी जाळीने बंदिस्त केलेला असून पत्र्याच्या बाजूने असलेल्या छोट्याशा जागेतून बिबट्याने आतमध्ये प्रवेश करुन त्याच्या सात शेळ्या ठार केल्या आहेत.
दरम्यान मंगळवारी सकाळी प्रा. कान्हु गिते यांनी वनविभागाला घटनेबाबत माहिती दिली. परंतू उशीरा पर्यंत वनविभागाचे कर्मचारी तिकडे फिरकले नसल्याची माहिती गिते यांनी दिली आहे. तर गिते यांच्या विक्रीसाठी आलेल्या सात शेळ्या बिबट्याच्या हल्यात ठार झाल्यामुळे अंदाजे ८० हजार ते १ लाख रुपयाचे नुकसान झाल्यामुळे वनविभागाने गिते यांना तात्काळ अर्थिक मदत व या ठिकाणी पिजंरा लावुन बिबट्या जेरबंद करावा अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे.
वीस वर्षापूर्वी च्या जखमा आजही ताज्या..
सुमारे वीस वर्षापुर्वी बिबट्याने यांच वस्तीच्या काही फूट अंतरावर एका सहा वर्षीय मुलीला ठार केले होते. या घटनेनंतरचं अहमदनगर जिल्ह्यात बिबट्याचं अस्तित्व असल्याचे उघडकीस आले होते. तर तब्बल २० वर्षानंतर पुन्हा त्याच ठिकाणी बिबट्याने सात शेळ्या ठार केल्याने त्या कुटुंबाच्या जखमा आजही जशाचा तशा ताज्या असल्याचे दिसून आले आहे.