◻ पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ७४ आशा सेविकांना करोना विमा पाॅलीसीचे आ. विखेकडून संरक्षण.
संगमनेर Live | संकटात सापडलेल्या जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा धान्य वाटत होते, तेव्हा जिल्ह्यातील तीनही मंत्री घरात बसून फक्त श्रीमंताचाच विचार करीत होते. गरीबाचे अश्रू पुसण्यासाठी सुध्दा यांना जावेसे वाटले नसल्याची खरमरीत टिका माजी मंत्री व भाजप नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहाकार्याने शिर्डी विधानसभा मतदारसंघातील ३५० आशा सेविकांना करोना विमा पाॅलीसीचे संरक्षण कवच देणारा राज्यातील पहीला उपक्रम राबविण्यात आला याप्रसंगी संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथे आयोजित कार्यक्रमात आ. विखे पाटील बोलत होते.
समाजाच्या आरोग्य संरक्षणासाठी मागील अनेक दिवसांपासून आशा सेविका जीव धोक्यात घालून काम करीत आहे. राज्य सरकारकडून या आशा सेविकांना कोणतेही संरक्षण नाही. आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मतदारसंघातील ३५० आशा सेविकांना स्वतःच्या खर्चातून ही करोना विमा पाॅलीसी देवून संरक्षण देवू केले.
शिर्डी मतदारसंघात समाविष्ट असलेल्या संगमनेर तालुक्यातील गावांमध्ये कार्यरत असलेल्या ७४ आशा सेविकांना या विमा पाॅलीसीचा लाभ आ. विखे पाटील यांनी दिला. यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात आशा सेविकांना आँँक्सिपल्स मीटर, मास्क आणि या पाॅलीसीचे वितरण करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना आ. विखे पाटील यांनी सांगितले की, करोना संकटाच्या काळात अन्नधान्या पासून ते आरोग्य केंद्राना साहित्याची उपलब्धता करुन दिली. पण ज्यांची जबाबदारी होती त्या तीनही मंत्र्यांनी जिल्ह्याकडे पाठ फिरवली. लोकांची आजही खायची भ्रांत आहे, पण मंत्री फक्त श्रीमंताचाच विचार करून अर्थव्यवस्थेचे धडे पंतप्रधानाना देत असल्याची टिका आ. विखे पाटील यांनी केली.
ऐन खरीप हंगामात शेतकऱ्यांना जादा दराने युरीया खताची खरेदी करावी लागली. सोयाबीन बियाणांमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक झाली तेव्हा न बोलणारे अचानक आता कांद्याच्या प्रश्नावरून केंद्र सरकारवर टिका करीत आहेत. पण या देशातील शेती आणि शेतकऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलासा दिला असून नुकतेच कृषी विधेयक मंजूर झाल्याने कृषी क्षेत्राला स्वातंत्र्य मिळवून दिल्याबद्दल आ. विखे यांनी केंद्र सरकारचे अभिनंदन केले.
देश संकटात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामान्य माणसांसाठी २० लाख कोटी रुपयांच्या आत्मनिर्भर भारत योजनेचे अभियान सुरू करून या देशातील जनतेला नवा आत्मविश्वास दिला असल्याचे आ. विखे पाटील यांनी सांगितले.
याप्रसंगी प्रवरा बँकेचे चेअरमन बाळासाहेब भवर, संचालक डॉ. दिनकर गायकवाड, विनायक बालोटे, अँड. अनिल भोसले, मकरंद गुणे, एकनाथ नागरे, भगवानराव इलग, भाऊसाहेब जऱ्हाड, पंचायत समिती सदस्य निवृती सांगळे, सौ. दिपाली डेंगळे, सौ. कांचन मांढरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. तय्यब तांबोळी, डॉ. कोडांजी मदने, बाळासाहेब मांढरे, माधवराव भोसले, अशोक म्हसे, भागवत उंबरकर, विजय शेळके, मिलिंद बोरा, ज्ञानेश्वर वाकचौरे, हरिभाऊ ताजणे, अजय ब्राम्हणे, विकास गायकवाड यांच्यासह आशा सेविका उपस्थित होत्या.