संगमनेर Live | सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सह. साखर कारखान्याचा सन २०२०-२१ या गळित हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ मंगळवार दि. २९ सप्टेबर रोजी सकाळी ९ वाजता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात व सौ. कांचनताई बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते, विधान परिषद सदस्य आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या अध्यक्षतेखाली व शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष बाजीराव खेमनर व कारखान्याचे माजी चेअरमन अॅड. माधवराव कानवडे, सौ. दुर्गाताई तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन बाबा उर्फ प्रतापराव ओहोळ यांनी दिली.
नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात सर्वाधिक भाव देणारा सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सह. साखर कारखाना हा देशातील अग्रगण्य कारखाना म्हणून ओळखला जातो. या कारखान्याने स्व. भाऊसाहेब थोरात यांची कडवी शिस्त, काटकसर, पारदर्शकता व उत्कृष्ट व्यवस्थापन आणि महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या कुशल मार्गदर्शनामुळे ५५०० मेट्रीक टन व ३० मेगावॅट वीज निर्मिती असलेल्या या कारखान्याने राज्यात आदर्श निर्माण केला आहे.
जगात व राज्यात आलेल्या कोरोना संकटात कारखान्याने तालुक्यातील नागरिकांना मदत व्हावी यासाठी वसंत लॉन्स येथे अद्यावत ३०० बेडचे कोविड सेंटर सुरु केले आहे. तर सातत्याने नामदार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली या संकटकाळात कारखाना नागरिकांच्या मदतीसाठी काम करत आहे.
या बॉयलर अग्निप्रदिपन समारंभासाठी अमृत उद्योग समूहातील व संगमनेर तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी सर्व सभासद, ऊस उत्पादक व शेतकरी बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष हासे, सर्व संचालक व कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले आहे.