◻ आसमानी संकटाने शेतकऱ्याचे कंबरडे मोडले.
संगमनेर Live | (राजू नरवडे) : संगमनेर तालुक्याच्या पठारभागात गेल्या काही दिवसांपासून सतत होत असलेल्या मुसळधार पावसाने शेतकरी चांगलेच वैतागले आहेत. त्यातच पुन्हा एकदा शनिवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या ढग फुटी सदृश्य पावसामुळे नांदुर खंदरमाळ, माळेगाव पठार, डोळासने, कर्जुले पठार, तळेवाडी, महालवाडी, सावरगाव घुले, पोखरी बाळेश्वर, जवळेबाळेश्वर, धुमाळवाडी, पेमरेवाडी, भोजदरी, सावरगाव तळ, वरुडी पठार व ढोरवाडी हे संपुर्ण सेंद्रिय लाल कांद्याचे आगार पूर्णपणे उध्वस्त झाल्याने एका मागून एक येणाऱ्या आसमानी व सुलतानी संकटांनमुळे सर्व सामान्य शेतकऱ्याचे अक्षरशा कंबरडे मोडले असल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे.
२०२० हे वर्ष शेतकऱ्यानसाठी जणू काही धोक्याची घंटाच ठरले आहे. आधीच शेतीमालाला बाजारभाव नाही, निसर्ग चक्रीवादळ अनं वरून कोरोनाचे संकट, आता मुसळधार पाऊस त्यामुळे सर्व सामान्य शेतकरी अक्षरशा मेटाकुटीस आला आहे. कोणत्याच शेती मालाचे पैसे झाले नाही. साठवलेला गावठी कांदाही निम्म्याच्यावर सडून गेला आहे. त्यातच कुठे तरी कांद्याला बाजारभाव वाढले त्यामुळे शेतकऱ्याना दोन पैसे मिळतील अशी अपेक्षा लागली होती. पण केंद्र सरकारच्या पोटात दुखायला सुरूवात झाल्याने लगेच त्यांनी निर्यात बंदी लागू केली. त्यामुळे सगळीकडूनच शेतकऱ्याचे मरण झाले आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून सतत होत असलेल्या मुसळधार पावसाने पठार भागाला अक्षरशा झोडपून काढल्याने शेतकऱ्यांचा तोंडचा घास या पावसाने हिरावून नेला आहे.
पुन्हा शनिवार दिनांक १९ सप्टेंबर रोजी पडलेल्या ढग फुटी सदृश्य पावसामुळे कांद्यासह आदि पिक पाण्याखाली गेले आहेत. सगळीकडे शेतांनमध्ये पाणीच पाणी साचलेले पाहवयास मिळत आहे. संपूर्ण पिक सध्या पाण्याखाली आहेत. आधीच सेंद्रिय लाल कांद्याला जास्त पाणी सहन होत नाही, पण सध्या कांद्याच्या रानामध्ये पाणीच पाणी साचलेले पाहवयास मिळत आहे. कांदे, टोमॅटो, डाळींब, सोयाबीन, भुईमूग, बाजरी आदि पिकांनसाठी शेतकऱ्याचा खते व औषधांचा मोठा खर्च झाला आहे. मात्र तोही वसूल होतो की नाही अशी अवस्था पिकांची झाली आहे. पाऊस इतका भयानक होता की अनेक ठिकाणी शेतांनमध्ये पाणी घुसून शेतातील मातीही मोठ्या प्रमाणात वाहून गेली आहे. तर काही शेतांना नदीचे स्वरूप आले आहे. कधी न वाहणारे ओढे नाले ही तुडूंब भरून वाहात आहे. पावसाचे पाणी रस्त्यांवर आल्याने अनेक गावांचा संपर्कही काही काळासाठी तुटला होता. त्यामुळे शेतकऱ्यानी ‘ जगाव की मराव ’ अशा अवस्था शेतकऱ्याची झाली आहे.
त्यामुळे महसूल व कृषी विभागाने त्वरीत पिकांचे पंचनामे करावे अशी मागणी नांदूर गावचे माजी सरपंच गणेश सुपेकर, युवा नेते बाळासाहेब ढोले, प्रगतशिल शेतकरी सुरेश गाडेकर, माजी सरपंच भाऊसाहेब भागवत, खंदरमाळ गावचे उपसरपंच प्रमोद लेंडे, जय किसान पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब भागवत, कर्जुले पठार गावचे सरपंच रवींद्र भोर, आंबीखालसा गावचे माजी उपसरपंच दत्तात्रय कान्होरे, अकलापूरचे माजी उपसरपंच संतोष देवकर, अशोकराव वाघ, संपतराव आभाळे, पोखरी बाळेश्वर सोसायटीचे चेअरमन तुकाराम फटांगरे, बाळेश्वर देवस्थानचे विश्वस्थ रंगनाथ फटांगरे आदिसह शेतकऱ्यानी केली आहे.