◻ नुकसान भरपाईच्या निकषात बदल करुन नुकसानीचे पंचनामे करण्याची केली सूचना.
संगमनेर Live | राज्यात सातत्याने सुरु असलेल्या पावसामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीचे गांभिर्य लक्षात घेवून, शेतकऱ्यांना मदत मिळवी म्हणून नुकसान भरपाईच्या निकषात बदल करावेत आणि राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी माजीमंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार यांना दिलेल्या निवेदनात आ. विखे पाटील म्हटले आहे की, सद्य परिस्थितीत राज्यात सातत्याने संततधार पाऊस सुरु आहे. बहुतांशी तलाव, लघु, मध्यम व मोठे प्रकल्प पुर्ण क्षमतेने वाहत असुन, ओढे, नाले व नद्यांना आलेल्या पुराचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आल्याने हाताशी आलेली खरीपाची पिके जमीनदोस्त झाली आहेत. एकाच दिवसात ६५ मिलीमिटर पाऊस झाला तरच नुकसान भरपाई देण्याचे शासनाचे धोरण आहे. परंतू राज्यात झालेल्या पावसाची आकडेवारी ही शासनाच्या मदतीच्या निकषा पलिकडे गेली असल्याची बाब आ. विखे पाटील यांनी मंत्र्यांच्यानिदर्शनास आणून दिली आहे.
यावर्षी मान्सुन वेळेवर सुरु झाल्याने कोवीडचा प्रादुर्भाव असल्याने राज्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कष्ट घेतले. बाजरी, सोयाबीन, कडधान्य, मका, कांदा इत्यादी पिकांची करण्यात आलेली पेरणी चांगल्या पध्दतीने होवून पिकही काढणीसाठी आलेली होती. मात्र सततच्या पावसामुळे हाताशी आलेली पिक जमिनदोस्त झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यापुर्वी बोगस बियाणांमुळे झालेली फसवणूक, शेतकऱ्यांवर आलेले दुबार पेरणीचे संकट आणि आता नैसर्गिक आपत्ती यामुळे शेतकरी हवालदिलझाला असून, राज्य सरकारकडुन शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा आहे. मात्र पंचनाम्याच्या निकषात बदल केल्याशिवाय शेतकऱ्यांच्या पदरात ही मदत पडणार नसल्याने विशेष बाब म्हणून नुकसान भरपाईच्या निकषात बदल करुन नुकसानीचे पंचनामे करावेत आणि राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आ. विखे पाटील यांनी केली आहे.