संगमनेर Live (अमोल मतकर) | भारताला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे पूर्ण झाली असली तरी आज ही अनेक गावे ही मूलभूत सेवा सुविधांपासून शेकडो मैल लांब असल्याचे पहावयास मिळत असून अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात सदन समजल्या जाणाऱ्या संगमनेर तालुक्यातील पठार भागात खांडगेदरा गाव आहे, त्या गावामध्ये अनेक सेवा सुविधांचा अभाव असल्याने येथील नागरिकांना आपण आज ही पारतंत्र्यात राहत असल्याची जाणीव होत असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.
देशाला स्वातंत्र मिळून ७४ वर्षांचा प्रदीर्घ कालावधी उलटला तरी, आजही गाव, खेड्या-पाड्यात, आदिवासीवाड्या, वस्त्यात विकासाची किरणे पोहोचली नसल्याचे कटू वास्तव पत्रकार अमोल मतकर यानी समोर आणले आहे.
संगमनेर तालुक्यातील खांडगेदरा गावाला महाराष्ट्र शासनाचा वन विभागाचा संत तुकाराम तृतीय पुरस्कार प्राप्त झाला त्यावेळी गाव चर्चेत आले होते. फार कौतुक झाले खरे पण आज मात्र हे गाव समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. हे गाव संगमनेर तालुक्यात असले तरी अकोले मतदार संघात येते. ६०० ते ७०० लोकवस्ती असलेल्या गावात कोणत्याही शासकीय सुविधा नसल्याने गावकरी हैराण झाले आहेत. गावात कोणत्याही कंपनीच्या मोबाईलला रेंज नाही त्यामुळे मुले ऑनलाईन शिक्षणापासून वंचित आहेत. त्यामुळे वैतागलेले विद्यार्थी ४ ते ६ किलोमीटर प्रवास करून बाजूच्या गावांना जाऊन खाजगी शिकवण्याना प्रवेश घेत आहेत. त्यामुळे पालकाना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
सरकार जे धान्य पुरवते ते घेण्यासाठी स्वस्त धान्य दुकानामध्ये हाताच्या बोटांचा ठसा द्यावा लागतो. तो देण्यासाठी सुध्दा गावकऱ्याना शेजारच्या गावाला यावे लागते. डिजिटल इंडियासाठी कोट्यावधी रुपये खर्च झाले. मात्र या गावात खडकू ही न आल्याने गावची परिस्थिती जैसे थे आहे. गावच्या रस्त्याचाही प्रश्न प्रलंबित असल्याने ग्रामस्थानी लोकवर्गणी व लोकसहभागातून येथिल पुलाचे काम काम केले. परंतू मागील पंचवीस वर्षापासून रस्ताची कामे रखडल्याने ग्रामस्थं आक्रमक झाले आहेत.
त्यामुळे समस्यांच्या विळख्यात अडकलेले खांडगेदरा गावाची ही दुरावस्था व समस्यांचे निराकार करण्याची मागणी गावचे सामाजिक कार्यकर्ते व सेवा निवृत्त सहायक पोलिस निरीक्षक रोहिदास महादू ढोकरे, जालिंदर ढोकरे, वैभव ढोकरे, वैभव खांडगे आदिसह ग्रामस्थांनी केली आहे.
आमच्या गावात असंख्य अडचणी आहेत, त्यात महत्वाचे म्हणजे सध्या ऑनलाईन शिक्षण चालू आहे आणि आमच्या गावात मोबाईलला रेंज नसल्याने रोज ६ किलोमीटर अंतरावर दुसऱ्या गावात जाऊन शिक्षण घ्यावे लागते. त्यामुळे आम्ही काय करावे, कुठे जावे काहीच कळत नाही. सरकारने लवकरात लवकर आमच्या समस्या दूर कराव्यात. अशी मागणी कु. वैभव अण्णासाहेब ढोकरें या विद्यार्थ्याने केली आहे.