◻आश्वी परिसरात बिबट्याचा वावर वाढला.
संगमनेर Live | तालुक्यातील पिप्रीं - लौकी अजमपूर येथिल भाऊसाहेब पढंरीनाथ गिते याच्या गोठ्यात बिबट्याने मंगळवारी मध्यरात्री प्रवेश करत गाभन शेळी ठार केली असून परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, भाऊसाहेब पढंरीनाथ गिते याचा गट नंबर ५८/३ मध्ये शेळ्याचा गोठा असून मंगळवारी मध्यरात्री पावसाची रिपरिप सुरु असल्याने विजप्रवाह खंडीत झाला होता. याचाच शिकारीच्या शोधात निघालेल्या बिबट्याने फायदा घेतला व गिते याच्या गोठ्यात प्रवेश करुन गाभन शेळी ठार करत तिला गोठ्याबाहेर ओढत नेले. शेळ्याचा गोगांट झाल्याने गिते यानी गोठ्यात जाऊन पाहिले असता इतर शेळ्या भेदरलेल्या अवस्थेत उभ्या होत्या तर एक शेळी गायब दिसली. त्यामुळे त्यानी पुढे जाऊन पाहिले असता बिबट्या शेळीला ओढताना नजरेस पडला. त्यामुळे गिते यानी मोठ्याने आरडाओरडा करण्यास सुरवात केली त्यामुळे बिबट्याने शेळी तेथेच टाकून झुडपात पलायन केले.
दरम्यान गिते यानी सकाळी वनविभागाला याबाबत माहिती दिल्यानंतर वनपाल पोपट नागरे यानी घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा केला असून १५ हजार रुपये नुकसान झाल्याची माहिती गिते यानी दिली आहे. परिसरात लहान बालके तसेच लोकाचा शेतात वावर असल्याने कोणतीही अप्रिय घटना घडण्याआधी हा बिबट्या जेरबंद करावा अशी मागणी गणेश लावरे, विकास गिते, प्रविण गिते, सुनिल गिते, राजेद्रं गिते आदि शेतकऱ्यानी केली आहे.