प्रत्‍येक रुग्‍णालय ऑक्सिजनच्‍या सुविधेने स्‍वयंपूर्ण करण्‍याचा मानस - ना. प्रकाश जावडेकर

संगमनेर Live
0

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनमध्‍ये देशातील पहिल्‍या ऑस्किजन प्रकल्‍पाचे लोकार्पण.

संगमनेर Live (नगर) | पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली नवा भारत घडविताना प्रत्‍येक रुग्‍णालय ऑक्सिजनच्‍या सुविधेने स्‍वयंपूर्ण करण्‍याचा मानस केंद्रीय मंत्री ना. प्रकाश जावडेकर यांनी केला. रुग्‍णालयातील बेडच्‍या संख्‍येनुसार ऑक्सिजन प्रकल्‍पाची सक्‍ती करण्‍याचा नियम सरकार लवकरच करणार असल्‍याचे सुतोवाचही त्‍यांनी केले.

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनमध्‍ये कार्यान्वित झालेल्‍या  स्‍वयंपूर्ण अशा देशातील पहिल्‍या ऑस्किजन प्रकल्‍पाचे लोकार्पन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्‍या हस्‍ते व्‍हर्चुअल रॅलीच्‍या माध्‍यमातून संपन्‍न झाले. प्रबोधनकार निवृत्‍ती महाराज इंदोरिक यांच्‍या प्रमुख उपस्थितीत झालेल्‍या या कार्यक्रमास माजी मंत्री आ. राधाकृष्‍ण विखे पाटील, डॉ विखे पाटील फौंडेशन चे मुख्य कार्यकारी अधिकारी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, समाज प्रबोधनकार हभंप निवृत्ती महाराज इंदुरीकर, जिल्हापरिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, विश्वस्त डॉ. सुप्रियाताई ढोकणे-विखे पाटील, ॲड. वसंतराव कापरे, सुभाष भदगले, लेफ्टनंट जनरल डॉ. बी. सदानंदा रिटायर्ड, उपसंचालक डॉ. अभिजीत दिवटे, तांत्रिक संचालक डॉ. पांडुरंग गायकवाड यांच्‍यासह फौंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना ना. जावडेकर म्‍हणाले की, करोनाच्‍या दुसऱ्या लाटेत ज्‍या त्रृटी प्रामुख्‍याने दिसून आल्‍या त्‍यामध्‍ये ऑक्सिजनचा अपुरा पुरवठा ही समस्‍या सर्वांनाच भेडसावली. अनेक रुग्‍णालयात ऑस्किजन प्रकल्‍प नाहीत हे प्रामुख्‍याने जाणवले. त्‍यामुळेच ऑक्सिजनची उपलब्‍धता करणे हे मोठे आव्‍हान बनले. संकटाच्‍या काळातही एक हजार टन ऑक्सिजनची उपलब्‍धता केली. यासाठी देशातील स्टिल उद्योजक आणि औद्योगिक क्षेत्रातील कंपन्‍यांनीही मोठी मदत केली असुन पीएम केअर फंडातूनही आता ऑक्सिजन प्रकल्‍प उभा करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला आला आहे.

डॉ. विखे पाटील फौंडेशनने कार्यान्वित केलेला ऑक्सिजन प्रकल्‍प ही एक चांगली सुरुवात असून, हा स्‍वयंपूर्ण प्रकल्‍प असल्‍याने टॅंकरची वाट पाहावी लागणार नाही. भविष्‍यात हॉस्पिटलमध्‍ये असलेल्‍या बेडच्‍या संख्‍येच्‍या प्रमाणात ऑक्सिजन प्रकल्‍प उभारण्‍याचा नियम सरकार करेल असे सुतोवाच करुन जावडेकर म्‍हणाले की, देशात टंचाई निर्माण झाल्‍यानंतर परदेशातून ऑक्सिजन मागवावा लागला. कंटेनरची संख्‍याही कमी आहे, परंतू कुठेही कमी न पडता साधनांची उपलब्‍धता करुन ऑक्सिजन पुरविण्‍याचे काम केंद्र सरकारने केले असल्‍याचे त्‍यांनी आवर्जुन सांगितले. विखे पाटील परिवाराने सेवेचे काम समजून हा प्रकल्‍प उभारण्‍याचा केलेल्‍या निर्णयाचे त्‍यांनी कौतूक केले.

हभप इंदोरिकर महाराज देशमुख म्‍हणाले की, काळाची गरज ओळखून विखे पाटील परिवार समाजासाठी काम करत असतो. सेवेची अनुवंशीकता ही त्‍यांच्‍या सर्व पिंढ्यांमध्‍ये पाहायला मिळते. कोव्‍हीडच्‍या सं‍कटात या परिवाराने जिल्‍ह्यासाठी खुप काही केले. या सेवेतच खरे समाधान आहे असा उल्‍लेख करुन ते म्‍हणाले की, कोव्‍हीडच्‍या संकटाला घाबरुन चालणार नाही. आत्‍मविश्‍वासानेच  सामोरे जावे लागले. या आत्‍मविश्‍वासातच आत्मिक समाधान असल्‍याचे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

आ. राधाकृष्‍ण विखे पाटील म्‍हणाले की, पद्मश्री डॉ. विखे पाटील आणि आदरणीय खासदार साहेबांनी लावलेल्‍या या रोपट्याचे आज वटवृक्षात रुपांतर होत असताना मानवतेच्‍या कल्‍यानाचा जो विचार त्‍यांनी रुजविला तोच आम्‍ही पुढे घेवून जात आहोत. कोव्‍हीड संकटात डॉ. विखे पाटील फौंडेशन आणि जनसेवा फौंडेशनच्‍या माध्‍यमातून मोठी मदत करता आली. हा ऑस्किजनचा प्रकल्‍प हा सेवेचाच एक भाग असून, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी मोठ्या धैर्याने या संकटातून देशाला सावरले. लसीकरणाच्‍या माध्‍यमातून देश पुन्‍हा आत्‍मविश्‍वासाने उभा राहत असल्‍याचा उल्‍लेख त्‍यांनी केला. खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी खासदार साहेबांच्‍या आठवणींना आपल्‍या भाषणात उजाळा दिला. खासदार साहेब आणि माझा नेहमीच संवाद असायचा यातून ते मंत्री असताना आम्‍ही अनेक गोष्‍टी ठरविल्‍या आणि केल्‍याचे त्‍यांनी आवर्जुन यावेळी सांगितले.

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !