मनुष्याने मातीशी नाते कधीही विसरू नये- डॉ. महावीरसिंग चौहान.
संगमनेर Live (लोणी) | लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात ऑनलाईन कृषी कविसंमेलन पार पडले असून कृषी विषयक महाविद्यालयांनी कृषी कविसंमेलन आयोजित करणे हे प्रेरणादायी आहे, तसेच महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी शेतीचे नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून शेतीच्या माध्यमातून प्रगती साधावी व शेतकरी जीवनाला सन्मान प्राप्त करून द्यावा असे प्रतिपादन आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलतांना जेष्ठ साहित्यिक व कवी डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी म्हटले आहे.
लोकनेते पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली. कृषी दिनानिमित्त डॉ. महावीरसिंग चौहाण, तसेच प्राचार्य प्रा. ऋषिकेश औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रविण गायकर, यांच्या संकल्पनेतून दरवर्षी कृषी कविसंमेलन आयोजित करण्यात येत असते, त्याप्रमाणे याही वर्षी सलग चौथ्यांदा कृषी कवी संमेलन आयोजित करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सदर कविसंमेलन हे ऑनलाईन पद्धतीने आयोजित केले होते. महाविद्यालयात स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस अभिवादन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. यावेळेस डॉ. महावीरसिंग चौहाण म्हणाले कि मनुष्याने मातीशी नाते कधीही विसरू नये. तसेच डॉ. कैलास कांबळे यांनी कृषी कविसंमेलनातुन नवोदित शेतकरी तरुणांना व्यासपीठ मिळेल अशा भावना व्यक्त केल्या.
या कृषी कविसंमेलन कार्यक्रमानिमित्त विद्यार्थी कल्याण अधिकारी आणि संचालक, राष्ट्रीय सेवा योजना, डॉ. महावीरसिंग चौहाण, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे डॉ. बाबुराव उपाध्ये, साहित्यिक व कवी डॉ.कैलास कांबळे, प्राचार्य ऋषिकेश औताडे आदी मान्यवर उपस्थितीत होते. सदर कृषी कवी संमेलनात कृषी व कृषी क्षेत्राशी निगडीत कवितांचे सादरीकरण करण्यात आले. त्यामध्ये जेष्ठ साहित्यिक व कवी डॉ. बाबुराव उपाध्ये, डॉ. महावीरसिंग चौहाण आणि डॉ. कैलास कांबळे यांनी आपल्या कवितांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. विविध महाविद्यालयीन तरुणांनी कविसंमेलनात प्रत्यक्ष सहभाग नोंदविला त्यात चि. ऋषिकेश चोळके, कु. प्रिया गवळी, कु. दिप्ती शेळके, चि. विश्वजित घोटेकर, कु. आरती माळवदे, कु. ऋतुजा पुरी यांनी आपल्या कविता सादर केल्या. कवी संमेलनाबाबत उपस्थितांनी आनंद व्यक्त केला आणि महाविद्यालयास पुढेही कृषी कृषी कविसंमेलन सुरु ठेवावेत याबाबत शुभेच्छा दिल्या.
कविसंमेलन यशस्वी करण्यासाठी प्रा. प्रविण गायकर, प्रा. अमोल सावंत, प्रा. महेश चंद्रे, प्रा. मीनल शेळके, प्रा. मनीषा आदिक, प्रा. सारिका पुलाटे, प्रा. भाऊसाहेब घोरपडे, प्रा. अमित अडसूळ तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक कु. दिप्ती भास्कर शेळके, चि. अनुराग देशमुख, कु. रुचा खैरनार, कु. रुचिका चौधरी आणि चि. ओमप्रकाश रमाकांत शेटे यांनी विशेष परिश्रम घेतले. सदर कविसंमेलन कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी तसेच तरुण ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते.