संगमनेर Live | महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यात सातत्याने विकास कामे सुरू आहेत. कोरोना संकटातही तालुक्यातील विकास कामांचा वेग कायम असून तळागाळातील असंघटित कामगार बांधवांसाठी नामदार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्या टप्प्यात १ हजार बांधकाम मजुरांना साहित्याचे वाटप करण्यात आले.
निमगावजाळी, आश्वी, प्रतापूर येथे नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे व इंद्रजित थोरात यांच्या हस्तें असंघटित कामगारांना या साहित्याचे वाटप झाले. यावेळी परिसरातील जेष्ठ व तरुण तरुण कार्यकर्ते्यासह असंघटित कामगार उपस्थित होते. याप्रसंगी वाटप करण्यात आलेल्या साहित्यामध्ये साहित्यपेटी, बुट, बॅग, बॅटरी, रेनकोट, मच्छरदाणी, जेवणाचा डबा व बांधकाम उपयोगी साहित्य असा मोठा संच होता.
यावेळी बोलताना आमदार डॉ. तांबे म्हणाले की, नामदार बाळासाहेब थोरात हे राज्यात अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सांभाळत असून संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गाव व वाडी वस्तीवरच्या विकासासाठी ते कटिबद्ध आहेत. शासनाच्या विविध योजना योग्य लाभार्थींना पोहोचवण्यासाठी यशोधन कार्यालयामार्फत विशेष यंत्रणा राबवली जात आहे. असंघटित कामगार हा उपेक्षित राहिला असून या कामगारांच्या करता यशोधन कार्यालयात स्वतंत्र विभाग कार्यरत करण्यात आला आहे. या अंतर्गत शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देत विविध साहित्य वाटप करण्यात संगमनेर तालुक्याचे अहमदनगर जिल्ह्यामध्ये अग्रक्रमांक मिळवला असल्याचेही ते म्हणाले
इंद्रजीत थोरात म्हणाले की, असंघटित कामगारांमध्ये बांधकाम मजूर, घरेलू कामगार यासाठी यशोधन कार्यालय स्वतंत्र विभाग करण्यात आला आहे. या अंतर्गत या कामगारांची नोंद केली जात असून त्यांना शासनाच्या विविध योजना मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला जात आहेत. नामदार थोरात यांच्या नेतृत्वाखाली या अंतर्गत सहा हजार कामगारांची नोंद करण्यात आली असून यातून पहिल्या टप्प्यात एक हजार कामगारांना विविध गावांमध्ये साहित्यांचे वाटप करण्यात येत आहे. यापुढील काळातही समाजातील विविध घटकांसाठी सातत्याने योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आपण सर्व कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले आहेत.