गांधी जयंतीपासून भारत-बांगला देश सद्भावना सायकल यात्रा.

संगमनेर Live
0

अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यातील कार्यक्रमास अण्णा हजारे, डॉ. सुब्बाराव, पोपटराव पवार उपस्थित राहणार.

संगमनेर Live (अहमदनगर)| भारताच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आणि बांगलादेश मुक्ती संग्रामाच्या सुवर्ण महोत्सवाचे औचित्य साधून स्नेहालय संस्थेने “ भारत - बांगलादेश सदभावना सायकल यात्रा " आयोजित केली आहे. महात्मा गांधी जयंतीला (२ ऑक्टोबर) अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यातून या यात्रेला सुरवात होणार आहे.

सायकलस्वारांना शुभेच्छा देण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे, स्वातंत्र्य सेनानी आणि ज्येष्ठ गांधीवादी डॉ. एस. एन. सुब्बराव, पद्मश्री पोपटराव पवार, कोटक महिंद्रा बँकेचे अध्यक्ष प्रकाश आपटे, मेहेरबाबा ट्रस्टचे मेहेरनाथ कलचुरी, आय लव्ह नगरचे नरेंद्र फिरोदिया, पेमराज सारडा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र शिंदे, रोटरीचे प्रांतपाल ओम मोतीपवळे, लायन हरजितसिंग वधवा आदी  उपस्थित असतील. सकाळी ९ वाजता किल्ल्यातील नेता कक्षासमोरील पटांगणात हा कार्यक्रम होणार आहे. यात्रेत प्रतिकात्मक सहभाग नोंदविण्यासाठी अहमदनगर ते पांढरीपुल असा सायकल प्रवास अनेक नागरिक यात्रेसोबत करणार आहेत.

बांगलादेश मुक्ती संग्रामात मोलाचे योगदान देणारे जवान, अधिकारी, तसेच शहिदांच्या कुटुंबीयांचा सन्मान यावेळी केला जाणार असल्याचे स्नेहालयाचे अध्यक्ष संजय गुगळे आणि सचिव राजीव गुजर यांनी दिली.

या सायकल यात्रेत विद्यार्थी, राष्ट्रीय छात्र सेना,राष्ट्रीय सेवा योजना यांच्यासह ज्येष्ठ मंडळीही सहभागी होणार आहेत. स्वतः श्री. हजारे, डॉ. सुब्बाराव, पोपटराव पवार आदी बांगलादेशला येणार आहेत. यात्रेचा समारोप १६ डिसेंबर रोजी १९७१ च्या युध्दाच्या स्वर्णिम विजय दिनी बांगलादेशातील नौखाली येथील गांधी आश्रमात होईल.

महाराष्ट्र, छत्तीसगड, ओरिसा, झारखंड, पश्चिम बंगाल ही राज्ये व बांगलादेशमधून सुमारे ३ हजार किलोमीटरचा प्रवास १०० सायकलस्वार करतील. थोड्या अंतरासाठी प्रत्येक गावातील युवा यात्रेसोबत सायकल चालवतील. रस्त्यातील गावांत मुक्काम करून, तेथील नागरिकांशी - स्वयंसेवी संस्थांशी संवाद साधून मैत्री आणि सद्भाव वाढवण्याचा प्रयत्न यात्री करतील. सामाजिक एकतेची प्रार्थना - गाणी - पथनाट्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी सादर केले जातील. सद्भावनेचं प्रतीक म्हणून संबंधित गावांमध्ये सद्भावना प्रेरणा वृक्ष (कडूनिंब आणि वड) लावण्यात येणार आहे.

भारत-पाकिस्तान फाळणीच्या पार्श्वभूमीवर नौखालीत उसळलेला हिंसाचार रोखण्यासाठी महात्मा गांधींनी ४ महिने नौखालीत वास्तव्य केले होते. गांधीजींचे कार्य आणि प्रेरणा जपणारा आश्रम तिथे आहे. बांगलादेशचे राष्ट्रपिता शेख मुजीब यांच्या जन्मशताब्दी वर्षाचं औचित्य साधून त्यांचे जन्मगाव तुंगीपारा,  ढाक्यातील त्यांचे स्मारक आणि संग्रहालयाला सायकल यात्री भेट देतील. “अनामप्रेम" या दिव्यांगांसाठी कार्यरत संस्थेने सायकल यात्रेच्या सांस्कृतिक उपक्रमांची जवाबदारी घेतली आहे. अंध आणि दिव्यांग कलाकारांचा संघ यात्रेत सादरीकरण करणार आहे.

यात्रेसाठी रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रल, लायन्स क्लब आणि घर घर लंगर उपक्रम सेंट्रल, पेमराज सारडा महाविद्यालय, आय लव्ह नगर, अवतार मेहेरबाबा ट्रस्ट, लष्कराची एसीसी अँड. सी आस्थापना आदींचे सहकार्य लाभले आहे. दरम्यान सायकल यात्रेबाबत अधिक माहितीसाठी 9881337775 वर संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !