◻ निळवंडे प्रकल्पाचे काम वेगाने पूर्णत्वाकडे.
संगमनेर Live (अहमदनगर) | अकोले तालुक्यातील निळवंडे येथे प्रवरा नदीवर बांधण्यात येत असलेल्या निळवंडे धरणाचे २०१४ पर्यत जवळपास १३ टक्के खोदकाम आणि ८.२३ टक्के भराव काम झाले होते. महाविकास आघाडी शासनाने या प्रकल्पाला मोठया प्रमाणावर आर्थिक निधी उपलब्ध करुन दिल्यामुळे गेल्या दोन वर्षाच्या कालावधीत १६ लक्ष ३८ हजार कुबिक मिटर खोदकाम आणि १४ लक्ष ५६ हजार क्यूबिक मिटर भराव काम झाले आहे. त्यामुळे निळवंडे धरणाचे काम वेगाने पूर्ण होत असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत आयोजित आढावा बैठकीत दिली.
नियोजन भवन, जिल्हाधिकारी, कार्यालय, अहमदनगर जिल्हयातील जलसंपदा विभागाच्या चालू असलेल्या कामांचा जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आज आढावा घेण्यात आला.
बैठकीला उत्तर महाराष्ट्र विभागाचे मुख्य अभियंता डॉ. संजय बेलसरे, विशेष प्रक्पल्प, पुण्याचे मुख्य अभियंता एस. टी. धुमाळ, अहमदनगरचे अधिक्ष्ाक अभियंता व लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे प्रशासक अ. रा. नाईक, नाशिकच्या अधिक्ष्ाक अभियंता व लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या प्रशासक श्रीमती अ. ह. अहिरराव, अहमदनगर मध्यम प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता का. ल. मासाळ, अहमदनगर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता जी. बी. नान्नेार, मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती सायली पाटील, कुकडी कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता स्वप्नील शिंदे, लघु पाटबंधारे क्रमांक दोन विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती संगिता जगताप, संगमनेर येथील उर्ध्व प्रवरा कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. लव्हाट, संगमनेर येथील उर्ध्व प्रवरा धरण विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. माने उपस्थित होते.
जिल्हयातील प्रलंबीत प्रकल्प त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. आमदार संग्राम जगताप यांच्या सूचनेप्रमाणे सीना नदीची निळी रेषा आणि लाल रेषा आखण्यात आली असून त्यात सुधारणा करण्याचे काम सुरु असल्याचे तसेच नदीपात्राचे रुंदीकरण आणि खोलीकरण करण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
अकोले मतदारसंघातील उच्च पातळीच्या कॅनॉलचे बांधकाम, पश्चिमकडे वाहून जाणाऱ्या पाण्यासाठी वळण बांधाऱ्यांचे काम करणे, श्रीरामपुरातील प्रवरा कालव्याची डागडुजी करुन त्याची वहन क्षमता वाढविणे, बंद पद्धतीने कॅनॉल बांधकाम करणे, मुळा नदीवरील कवठे गावाचा सतत फुटणाऱ्या कालव्याची दुरुसती करणे, पुररेषा नदीपात्राच्या बाहेरून नेणे, नद्यांमधील पाणी नदीपात्र सोडून बाहेर जाऊ नये यासाठी नदी खोलीकरण आदी कामांचा यावेळी मंत्री जयंत पाटील यांनी आढावा घेतला आणि सदरहू कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
आढळा मध्यम प्रकल्पाच्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी १० कोटी रुपये, देसवंडे येथे कोल्हापूरी पध्दतीचा बंधारा बांधणे, वावरस परिसरातील मुळा धरणाच्या बॅक वॉटरमध्ये पुलाचे बांधकाम करणे आणि गोदावरी नदीवरील ८४ कोटी रुपयांच्या कामांना मंजूरी देण्यात आली असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.