◻घारगाव पोलिसांकडून बैलजोडी शेतकर्याच्या स्वाधीन.
संगमनेर Live | बैलपोळ्याच्याच दिवशी बैलांवर पोलीस ठाण्याची वारी करण्याची दुर्दैवी वेळ आल्याची धक्कादायक घटना संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील दरेवाडी येथे घडली आहे. घारगाव पोलिसांनी चोरी गेलेल्या बैलजोडीचा छडा लावत ही बैलजोड शेतकर्याच्या ताब्यात दिली आहे. त्यामुळे पोपट्या - सर्जा बैलजोडीला पाहून शेतकर्याला गहिवरुन आले होते.
याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दत्तात्रय सखाराम इघे हे शेतकरी दरेवाडी येथे राहत आहे. रविवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे त्यांनी आपल्या पोपट्या व सर्जा या बैलांना घराच्या समोर बांधले होते. सोमवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास काही जणांनी इघे यांची बैलजोड सोडून पिकअपमध्ये घेवून जात होते. त्याच दरम्यान इघे यांनी विचारणा केली असता त्यांना धक्काबुक्की करून बळजबरीने बैलजोड चोरून कत्तलीसाठी घेवून गेले. बैल चोरून नेल्याची माहिती इघे यांनी मोबाईलवरून सगळ्यांना सांगितली आणि त्यानंतर इघे व काही शेतकर्यांनी तपास सुरू केला.
अनेकांनी बैलजोडी चोरी गेल्याचे स्टेटसही लावले होते तर काहींनी ही माहिती व्हाट्सएप ग्रुपवर टाकली होती. त्यानंतर निंभाळे येथे बैलजोडी असल्याची माहिती समजताच इघे यांच्यासह गावातील नागरिक त्याठिकाणी गेले होते. बैलजोडी इघे यांचीच असल्याची खात्री पटली. त्यानंतर ही बैलजोडी घारगाव पोलीस ठाण्यात आणण्यात आली. यावेळी पोपट्या व सर्जाला पाहून इघे या शेतकर्याचा चेहरा आनंदाने फुलून गेला होता. मात्र, बैलपोळ्याच्याच दिवशी बैलांना पोलीस ठाण्याची वारी करावी लागली आहे.
या प्रकरणी दत्तात्रय इघे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी बाळासाहेब पांडुरंग फड (रा. दरेवाडी) तर दुसरा बाळु मारूती कोळेकर (रा. डिग्रस) यांच्यासह इतर साथीदार गुन्हा रजिस्टर नंबर २०६/२०२१ भादंवि कलम ३९२, ३४ सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम सन १९७६ व सुधारित कायदा १९९५ चे कलम ५ (अ) (ब), ९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल कैलास देशमुख हे करत आहे.