राज्यातील महाविद्यालये २० ऑक्टोबरपासून सुरु होणार - उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत

संगमनेर Live
0
◻ दोन्ही डोस घेतलेले विद्यार्थी, विद्यार्थिनी प्रत्यक्ष उपस्थित राहू शकणार.

संगमनेर Live (मुंबई) | राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयातील नियमित वर्ग दि. २० ऑक्टोबर २०२१ पासून सुरु करण्यास मान्यता देण्यात येत आहे, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केली.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. सामंत म्हणाले की, ज्यांनी कोविड-१९ च्या लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत, ते विद्यार्थी, विद्यार्थिनी विद्यापीठ व महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहू शकतील आणि ज्या विद्यार्थी, विद्यार्थिनीने कोविड-१९ ची लस घेतलेली नाही, त्यांच्याकरिता विद्यापीठाने संबंधित संस्थांचे प्रमुख, महाविद्यालयांचे प्राचार्य यांचे मदतीने स्थानिक जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून लसीकरणासाठी विशेष मोहिम राबवून लसीकरण प्राधान्याने पूर्ण करुन घ्यावे. तसेच विद्यापीठ, महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे देखील लसीकरण प्राधान्याने करुन घ्यावे.

विद्यापीठ, महाविद्यालयांचे वर्ग पूर्णपणे की ५० टक्के क्षमतेने सुरु करावे, याबाबत स्थानिक प्राधिकरणांशी विचारविनिमय करुन विद्यापीठांनी त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यावा. प्रतिबंधित क्षेत्रात येणारी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालये ही ज्या आयुक्त, महानगरपालिका, नगरपालिका किंवा जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या अंतर्गत येतात, त्यांच्याशी कोविड-19 च्या आजाराचा स्थानिक पातळीवरील प्रादुर्भाव व स्थानिक परिस्थिती, प्रतिबंधित क्षेत्रांचे नियोजन व आरोग्यविषयक पायाभूत सुविधांची उपलब्धता या बाबी विचारात घेऊन, विद्यापीठे व महाविद्यालये सुरु करण्याबाबत विचारविनिमय करुन योग्य तो निर्णय संबंधित विद्यापीठाने त्यांच्या स्तरावर घ्यावा आणि महाविद्यालयांना सविस्तर मार्गदर्शक सूचना, मानक कार्य प्रणाली (एसओपी) देण्यात यावी, असेही त्यांनी यावेळी सांगीतले.

सर्व अकृषी विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयांना कोविड-१९ च्या व्यवस्थापनाबाबतचे राष्ट्रीय निर्देश, कामांच्या ठिकाणांबाबतचे अतिरिक्त निर्देश, राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचना मानक कार्य प्रणाली (एसओपी) तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना लागू राहतील. ज्या विद्यार्थी, विद्यार्थिनींना प्रत्यक्ष महाविद्यालयात उपस्थित राहता येणार नाही, त्यांना ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी.

वसतिगृहे टप्प्याटप्प्याने सुरु करण्याबाबत संचालक उच्च शिक्षण आणि तंत्रशिक्षण यांनी आढावा घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी. तसेच मुंबई महानगर क्षेत्रामध्ये वाहतुकीचे मुख्य साधन लोकल ट्रेन असल्याने विद्यार्थ्यांना प्रवासाची परवानगी मिळणे आवश्यक असल्याने याबाबतचा प्रस्ताव मुख्य सचिवांकडे पाठविण्यात येईल. विद्यार्थी आणि पालक यांनी सुद्धा काविड-१९ च्या पार्श्वभूमीवर जाहीर केलल्या नियमांचे पालन करुन लसीकरण करावे, असे आवाहनही मंत्री श्री. सामंत यांनी केले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !