खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आश्वी येथील शिष्टमंडळाने दिले जिल्हाधिकारी याना निवेदन.
संगमनेर Live | कोव्हीड संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून उपाययोजनांच्या करीता संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द आणि आश्वी बुद्रुक येथे लावण्यात आलेले नियम शिथील करावेत आशी मागणी व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली यासंदर्भात आश्वी येथील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेवून निवेदन दिले. निवेदनात ग्रामीण भागात निर्बध लावताना छोट्या व मोठ्या गावांना समान निकष लावू नयेत, आढळून आलेले रुग्ण एकाच भागातील अथवा एकाच कुटूंबातील असतील तर तेवढाच भाग बंद ठेवावा. सर्व तालुक्यात पुर्वीप्रमाणे व्यवहाराची वेळ निश्चित करून द्यावी आशा मागण्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांच्याकडे केल्या आहेत.
तालुक्यातील सर्व अर्थिक व्यवहार व व्यापार संगमनेर शहरातील बाजारपेठेवर अवलंबून आहे. शहरात मोठ्या प्रमाणात नागरीकांची होत असलेली गर्दी आणि कोरोनाचे पाळले जात नसलेले नियम यामुळेच कोव्हीडचा फैलाव ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात होत असल्याची बाब शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली.
तालुक्यातील सर्व विक्रेत्यांना व दुकानातील कर्मचाऱ्यांना लसीकरणाची सक्ती करावी, सर्व गाव सरसकट बंद करण्याऐवजी रुग्ण आढळून येणाऱ्या भागांवर निर्बध लावावेत, बाहेर गावावरून शहरात येणाऱ्या विक्रेत्यांची तपासणी व्हावी व सर्व अस्थापनांना कोरोनाचे नियम पाळणे सक्तीचे करावे आशी मागणी या शिष्टमंडळाने केली आहे.