संगमनेर Live | नगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात शनिवारी सकाळी आग लागल्याने मोठी खळबळ उडाली. या दुर्दैवी घटनेत १० रुग्णांचा मृत्यू झाला असून अनेक रुग्ण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात असून मृत्यू झालेल्या व्यक्तीमध्ये संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथिल दिपक विश्वनाथ जेडगुले (वय - ३७) यांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आयसीयूमध्ये एकूण १७ रुग्ण होते. शॉर्टसर्किटमुळे आयसीयूत शनिवारी सकाळी आग लागली. यामुळे १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सिताराम दगडू जाधव (बख्तपुर, ता. शेवगाव), भिवाजी सदाशिव पवार (किन्ही ता. पारनेर), रामकिसन विठ्ठल हरगुडे (माका ता. नेवासा), सत्यभामा शिवाजी घोडेचौरे (तेलकुडगाव ता. नेवासा), कोंडाबाई मधुकर कदम (केडगाव ता. नगर), आसराबाई गोविंद नागरे (शेवगाव), शाबाबी अहमद सय्यद (शेंडी ता. नगर), कडुबाळ गंगाधर खाटीक (नेवासा), दिपक विश्वनाथ जेडगुले (आश्वी, ता. संगमनेर) व एका अनोळखी पुरुष असे १० मृत्यू झाले आहेत.
नगर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या दलाने तसेच एमआयडीसी आणि लष्कराच्या दलाने आग आटोक्यात आणली. दरम्यान, आग लागल्यावर रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या मदतीने रुग्णांना अतिदक्षता विभागातून बाहेर काढले. अत्यवस्थ रुग्णांना इतर कक्षात स्थलांतरित करण्यात आले. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची माहिती घेतली आणि बचावकार्यास वेग दिला. आगीमुळे रुग्णालयातील अनेक वस्तू जळून खाक झाल्या आहेत.
घटनेची माहिती मिळताच आमदार संग्राम जगताप, खासदार सुजय विखे, माजी आमदार शिवाजी कर्डिले आदिसह विविध पक्षातील पदाधिकाऱ्यानी घटनास्थळ धाव घेतली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.
तसेच जिल्हा रुग्णालयात लक्ष्मण विठ्ठल थोरात (पाथर्डी), रंभाबाई पंजाराव विधाते (नेवासा), गोदाबाई पोपट ससाणे (श्रीगोंदा), यमुना तात्याराम कांबळे (केडगाव), लक्ष्मण आसराजी सावळकर (शेवगाव), संतोष धर्माजी ठोकळ (बीड) व अकुंश किसन पवार (राहुरी) याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान दिपक विश्वनाथ जेडगुले हे आश्वी खुर्द येथिल रहिवासी असून जिल्हा रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, एक भाऊ, भावजय, बहीण असा मोठा परिवार असून जेडगुलेसह १० रुग्णाची दुर्दैवी निधनवार्ता आश्वी परिसरात कळताचं शोककळा पसरली आहे.